मेट्रो रेल्वे : हेरिटेज समितीची १५ रोजी बैठकनागपूर : हेरिटेज समितीची येत्या १५ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात होणाऱ्या या बैठकीत उपराजधानीचे वैभव असलेल्या कस्तूरचंद पार्कच्या जागेवर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माहिती सूत्रानुसार आॅटोमोटिव्ह चौक ते मिहान दरम्यान धावणाऱ्या मेट्रो रेल्वेसाठी कस्तूरचंद पार्कची काही जागा मागण्यात आली आहे. नागपूरचे वैभव असलेल्या या स्मारकाचा विषय मागील काही दिवसांपासून हेरिटेज समितीकडे प्रलंबित आहे. कस्तूरचंद पार्क हे सुमारे ५० हजार ७६ चौ. मी. परिसरात विस्तारले आहे. त्यामुळे या स्मारकाच्या अस्तित्वाला कुठेही धोका पोहोचू नये, यासाठी खास काळजी घेतली जात आहे. पूर्वी मेट्रोसाठी कस्तूरचंद पार्क येथील २६५.९० चौ. मी. जागा मागण्यात आली होती. परंतु आता ती मागणी ४०८ चौ. मीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. स्टेशनवर चढणे आणि उतरण्यासाठी मेट्रोला ही जागा हवी आहे. माहिती सूत्रानुसार या जागेवर एक्सकेलेटर आणि जिना तयार केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी एनएमआरसीएलला एकूण ८७.४ हेक्टर जमिनीची गरज असून त्यापैकी आतापर्यंत ७६.४० टक्के जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. शिवाय उर्वरित जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.(प्रतिनिधी)
कस्तूरचंद पार्कचा तिढा सुटणार
By admin | Published: January 09, 2016 3:33 AM