कस्तूरचंद पार्कला मिळाले ५० लाख रुपये : हायकोर्टात माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 10:39 PM2020-10-29T22:39:02+5:302020-10-29T22:40:32+5:30
Kasturchand Park gets Rs 50 lakh, Nagpur news सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिव्हील लाईन्स येथील हेरिटेज कस्तूरचंद पार्क मैदानाचे समतलीकरण करण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली.
यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने कस्तूरचंद पार्कच्या दुरवस्थेची दखल घेऊन स्वत:च ही याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील दीपक ठाकरे यांनी न्यायालयाला ही माहिती दिली. तसेच, उर्वरित निधी अन्य माध्यमातून मिळवून मैदान समतलीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले जाईल असे सांगितले.
विविध विकास कामे, मुसळधार पाऊस व देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे कस्तूरचंद पार्क मैदान ठिकठिकाणी उंच-सखल झाले आहे. तसेच, मैदानावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने नागरिकांना चांगल्या पद्धतीने खेळता यावे याकरिता मैदानाचे समतलीकरण करण्याचा आदेश दिला होता. सरकार त्या आदेशाचे पालन करीत आहे. सुरुवातीला सरकारने निधीच्या कमतरतेचे कारण सांगून विषय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, न्यायालयाने सरकारला योग्य समज देऊन हे काम करणे आवश्यक असल्याचे बजावले होते. प्रकरणावर आता २५ नोव्हेंबर राेजी पुढील सुनावणी होईल. न्यायालय मित्र ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी याचिकेचे, ॲड. गिरीश कुंटे यांनी नासुप्रतर्फे तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे कामकाज पाहिले.