सत्र न्यायालय : दुकानाचे गाळे विकण्याच्या वादातून घडला होता थरारनागपूर : काटोल येथे चाकूने हल्ला करून एकाला ठार आणि तीन जणांना जखमी केल्याच्या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाच्या रकमेतील पाच हजार रुपये मृताच्या पत्नीला आणि प्रत्येकी एक हजार रुपये जखमींना नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. प्रेमचंद चंद्रभान चरडे (६३) असे आरोपीचे नाव असून, तो काटोलच्या चंडिका वॉर्ड दोडकीपुरा येथील रहिवासी आहे. नंदकिशोर नामदेव कोरडे (४०), असे मृताचे नाव होते. तो पंचवटी काटोल येथील रहिवासी होता. नंदकिशोरचे वडील नामदेव रघुनाथ कोरडे (७३), विलास महादेवराव चरडे (५६) आणि कुणाल ऊर्फ बाल्या गोविंदराव बाभूळकर (३५) रा. दोडकीपुरा, अशी जखमींची नावे आहेत. यातील जखमींपैकी विलास चरडे यांचे खटल्याची सुनावणी संपल्यानंतर नुकतेच आजाराने निधन झाले. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, आरोपी प्रेमचंद चरडे याने आपल्या घरासमोरील स्वत:च्याच मोकळ्या जागेत दुकानाच्या गाळ्यांचे बांधकाम केले होते. त्यापैकी खालचे एक गाळे त्याने नामदेव कोरडे यांना २००२ मध्ये विकले होते. कोरडे यांनी तेथे शुभम पशू खाद्य भंडार नावाचे दुकान सुरू केले होते. व्यवस्थित बांधकाम करून न देता आगाऊ पैसे घेतल्याने कोरडे कुटुंब आणि प्रेमचंद चरडे यांच्यात भांडण होऊन वैमनस्य निर्माण झाले होते. खुनीहल्ल्याची ही थरारक घटना २६ सप्टेंबर २०१३ रोजी घडली होती. घटनेच्या वेळी नामदेव कोरडे हे आपल्या शुभम पशू खाद्य भंडारसमोर बसलेले होते, तर त्यांचा मुलगा नंदकिशोर हा शेजारच्या कुणाल बाभूळकर याच्या दुकानासमोर बसलेला होता. त्याच वेळी प्रेमचंद चरडे हा बाहेरून आला होता. त्याने अचानक नामदेव कोरडे यांच्या मानेवर चाकूने वार केले होते. त्यानंतर त्याने शेजारी राहणारे विलास चरडे यांच्या गळ्यावर, हातावर चाकूने वार केल्यानंतर तो डोक्यात सैतान संचारल्याप्रमाणे नंदकिशोर याच्याकडे धावला होता. त्याला खाली पाडून त्याच्या छातीवर, गळ्यावर चाकूने वार केले होते. त्यानंतर लागलीच तो रक्ताने भरलेल्या अवस्थेत कुणाल बाभूळकरच्या सलूनच्या दुकानात शिरला होता. तेथे कुणालच्या गळ्यावर आणि हातावर वार केले होते. या थरारक घटनेने परिसरात पळापळ झाली होती. काटोलमध्ये पसरली होती दहशतया घटनेने या भागात दहशत पसरून लोकांनी आपापली दुकाने बंद केली होती. आरोपी प्रेमचंद चरडे हा घटनास्थळावरून पळून गेला होता. जखमींना मेडिकल कॉलेज इस्पितळाकडे उपचारार्थ रवाना करण्यात आले असता, नंदकिशोर कोरडे याचा मृत्यू झाला होता. नंदकिशोरची आई रेखाबाई कोरडे यांच्या तक्रारीवरून काटोल पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रेमचंद चरडे याला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बी. एन. ठाकरे यांनी करून, आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुराव्यांसह आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंड, भादंविच्या ३०७ कलमांतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि चार हजार रुपये दंड सुनावण्यात आला. न्यायालयात सरकारच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील विजय कोल्हे तर आरोपीच्या वतीने अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
काटोल खून खटला; आरोपीला जन्मठेप
By admin | Published: May 01, 2016 3:00 AM