काटोल पोटनिवडणुकीवर शुक्रवारी फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 09:47 PM2019-04-11T21:47:21+5:302019-04-11T21:49:34+5:30
विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीविरुद्धच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ उद्या शुक्रवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या काटोल मतदार संघातील पोटनिवडणुकीविरुद्धच्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ उद्या शुक्रवारी दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करणार आहे.
या प्रकरणावर गत मंगळवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी ही याचिका दाखल केली आहे. विधानसभेची सर्वसाधारण निवडणूक ऑक्टोबर-२०१९ मध्ये घ्यायची असल्यामुळे सप्टेंबर-२०१९ मध्ये आदर्श आचारसंहिता लागू केली जाईल. परिणामी, पोटनिवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराला आमदार म्हणून कार्य करण्यासाठी केवळ तीन महिन्याचा कालावधी मिळेल. दरम्यान, तो आपल्या मतदार संघासाठी कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ शकणार नाही. तसेच, पोटनिवडणुकीनंतर मतदार व इच्छुक उमेदवारांना लगेच सर्वसाधारण निवडणुकीला सामोरे जावे लागेल. याशिवाय २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अधिसूचनेद्वारे घोषित दुष्काळग्रस्त भागात काटोलचा समावेश आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीवर चार ते पाच कोटी रुपये खर्च करणे चुकीचे होईल. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेऊन मनुष्यबळ, वेळ, ऊर्जा व सरकारी निधी व्यर्थ घालवू नये, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.