लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला समाधानकारक यश मिळाले. जिल्ह्यात आघाडीच्या कोट्यात काटोल आणि हिंगण्याच्या दोन जागा होत्या. यात काटोलमध्ये घडीचा गजर करण्यात राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांना यश आले. देशमुख यांनी काटोलमध्ये कम बॅक करीत भाजपचे चरणसिंग ठाकूर यांचा १७ हजार ५७ मतांनी पराभव केला. देशमुख यांना ९६,८४२ तर ठाकूर यांना ७९,७८५ मते मिळाली.२०१४ मध्ये भाजपचे आशिष देशमुख यांनी अनिल देशमुख यांचा ५,५५७ मतांनी पराभव केला होता. आशिष यांनी मधल्या काळात भाजपला रामराम करीत आमदारकीचा राजीनामा दिला. ही संधी अनिल देशमुख यांनी कॅश केली. शेतकरी, शेतमजूर आणि जनसामान्यांचे प्रश्न घेत देशमुख रस्त्यावर उतरले. सरकारची अनेक प्रश्नावर कोंडी केली. लोकसभा निवडणुकीत काटोलमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना २२ हजार २०३ मतांची लीड मिळाल्यानंतर येथे राष्ट्रवादीच्या समर्थकांना धक्का बसला होता. मात्र शेवटच्या सहा महिन्यात देशमुख मतदार संघात दटून राहीले. याचा त्यांना फायदा झाला.हिंगणा मतदार संघात माजी मंत्री रमेश बंग यांच्या सहमतीने राष्ट्रवादीने उमेदवार बदलला. राष्ट्रवादीने येथे भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांना भाजपचे समीर मेघे यांच्याविरोधात मैदानात उतरविले. कुणबी विरुद्ध कुणबी अशी लढत देण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय चुकीचा ठरला. यातच येथे घड्याळाचे काटे उलटे फिरले. मतदारांनी मेघे यांच्या विकास कामांना कौल दिला. मेघे यांनी १,२१,३०५ मते मिळवित घोडमारे यांचा ४६,१६७ मतांनी पराभव केला. घोडमारे यांना ७५,१३८ मते मिळाली.