काटोल : काटोल व नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्राचे उत्पादन होते. यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा यासाठी येथील संत्रा विदेशात जाणे महत्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातून काटोल तालुक्यातील ढिवरवाडी येथे सिट्रस सेंटरला मंजुरी मिळाली आहे. येथे मूलभूत गरजांच्या निर्मितीसाठी १ कोटी रुपयाचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. या सेंटरच्या माध्यमातून काटोल व नरखेड तालुक्यातील संत्रा हा विदेशात पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे मत जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
ढिवरवाडी येथे सिट्रस सेंटर मंजूर झाल्यानंतर प्रथम बैठक घेण्यात आली होती. तीत जि.प.सदस्य सलील देशमुख, जि.प. सदस्य चंद्रशेखर कोल्हे, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, समितीचे सदस्य डॉ.अनिल ठाकरे, मनोज जवंजाळ, उपविभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, अजय लाडसे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, त्यांना संत्रा उत्पादनासाठी आधुनिक यंत्रसामुग्री व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे आदी काम या सेंटरच्या माध्यमातून होणार आहे.
मध्य भारतातील पहिली पाने तपासण्याची प्रयोगशाळा
आपल्याकडे सध्या माती परीक्षण व पाणी परीक्षणाची प्रयोगशाळा आहे. परंतु पाने तपासून झाडांना कोणता रोग आहे आणि त्यांसाठी काय उपाययोजना कराव्या यासाठीची कोणतीही प्रयोगशाळा नाही. या सेंटरच्या माध्यमातून ही प्रयोगशाळा ढिवरवाडी येथे साकारण्यात येणार आहे.