प्रवीण खापरे : लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित आयोजनावरून नाशिक विरुद्ध दिल्ली असा सामना रंगला आहे. मराठीच्या विकासासाठी एक पक्ष दिल्लीसाठी तर राजकीय कृतज्ञतेपोटी एक पक्ष नाशिकसाठी अडून बसला आहे. आता या सामन्यात शब्दच्छलाचाही वापर व्हायला लागला आहे. दिल्लीसाठी आग्रह धरणाऱ्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी टोला लगावला आहे. दिल्लीला दिल्लीकर नाही तर पुणेकर संमेलन मागत आहेत. ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशाच प्रकारची भावना ते काहीही न बोलता व्यक्त करत आहेत.
९४ व्या साहित्य संमेलनाच्या नियोजित स्थळाबाबत संवैधानिक प्रक्रिया पार न पाडता, हेकेखोरपणा दाखविला जात असल्याचा आरोप साहित्य वर्तुळातून महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यावर लावला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपल्याच शैलीत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. दोन वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन देण्यात आले होते. तेव्हा दिल्लीकरांनी विधिवत पत्र पाठवून महामंडळाकडे आयोजनासंदर्भात नकार दर्शवला होता. जेव्हा दिले तेव्हा नकार दर्शवला आणि आता इतका अट्टहास का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत संमेलनासाठी अडून बसलेले पुण्याचे संजय नाहर हे आमचे चांगले मित्र आहेत. मात्र, दिल्लीत संमेलन मागण्यासाठी दिल्लीकडून पुढाकार नाहीच. अशा स्थितीत पुण्याच्या माणसाने हा आग्रह का धरावा, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कौतिकराव ठाले-पाटील यांच्या एकूणच वक्तव्यावरून महामंडळ नाशिकलाच संमेलन आयोजित करण्यासाठी अडून बसल्याचे स्पष्ट होत आहे. यात राजकीय कृतज्ञता क्षणोक्षणी न बोलता व्यक्त केली जात आहे, हे विशेष.
कोरोनापासून कोण संरक्षण करणार?
भारतातून कोरोना संक्रमण कमी होत असताना दिल्लीत त्याचा प्रकोप संपता संपेना, अशी स्थिती आहे. संक्रमणाच्या काळात सर्वप्रथम दिल्लीत संमेलनासाठी परवानगी कशी मिळेल, हा प्रश्न आहे. त्यातच संमेलनात सहभागी होण्यासाठी देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठी सारस्वत, साहित्य रसिक प्रवास करून येणार आहेत. ताप, खोकला, सर्दी ही लक्षणे सामान्य आहेत. तेव्हा त्यांच्या क्वारंटाईनची व सुरक्षेची खात्री दिल्ली देईल का, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हा सगळा कट मोदी, गडकरींना खूश करण्यासाठीचा
दिल्लीचा आग्रह धरून बसणारे हे मोदी व गडकरी यांच्या जवळचे आहेत. त्यांना खूश करण्यासाठीचा हा सगळा कट असल्याचा गंभीर आरोपही कौतिकराव पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना लावला आहे. दिल्लीला विशेष संमेलन देण्याचा आमचा निर्णय आहे. मात्र, त्यास ते स्पष्ट नकार देत आहेत. यावरून नेमका प्रकार काय, हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.