अमृता फडणवीस : मुख्यमंत्री दत्तक ग्रामला भेट हिंगणा : कवडस गावातील समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. आगामी काळात गावातील समस्या सुटणार असून हे गाव आदर्श ग्राम म्हणून दूरवर ओळखले जाईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. हिंगणा तालुक्यातील कवडस हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले असून, तेथील आढावा घेण्यासाठी त्यांनी गावात भेट दिली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कवडसमध्ये दत्तक ग्राम फेटरीप्रमाणेच विकास करण्यात येईल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाला आ. समीर मेघे, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, स्वयंसेवी संस्थाध्यक्ष चंद्रकला सानप, सरपंच मनीषा गावंडे, तहसीलदार प्रताप वाघमारे, गटविकास अधिकारी महेंद्र जुवारे, उपअभियंता जी. के. राव, उपकार्यकारी अभियंता मदनकर, जिल्हा परिषद सदस्य वंदना पाल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र वाघ, पंचायत समिती उपसभापती हरिश्चंद्र अवचट, रंगराव पाल, विशाल भोसले, विकास दाभेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकातून सरपंच मनीषा गावंडे यांनी पिण्याचे पाणी, वन्यप्राण्यांचा हैदोस यासह इतर समस्यांकडे लक्ष वेधले. आ. मेघे यांनी या गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येईल, असे सांगितले. यावेळी उपसरपंच सतीश कंगाले, सदस्य अनिरुद्ध लामसोंगे, लंका गोंडगे, रसिका कांबळे, प्राजक्ता तुरणकर, वैशाली परतेकी, सुरेश गोंडगे, किशोर खरपे आदी उपस्थित होते. आभार पेंढरीचे सरपंच राजू दुधबुडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
कवडसला आदर्श गाव बनविणार
By admin | Published: February 22, 2017 2:52 AM