लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशीमबाग मैदानात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कविवर्य सुरेश भट सभागृह हा वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे. शहराचा चौफेर विकास होत असतानाच या सभागृहाच्या निर्मितीमुळे नागपूर शहराच्या वैभवात भर पडली आहे, असे प्रशंसोद्गार लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी काढले. गुरुवारी विजय दर्डा यांनी या वास्तूला भेट देऊ न पाहणी केली. प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ अशोक मोखा यांनी सभागृहाविषयी माहिती दिली.कॉन्फरन्स रूम व एक्झिबिशन हॉल, भव्य प्रेक्षागृह, ध्वनिप्रक्षेपण यंत्रणा, आकर्षक लॅडस्केपिंग बैठक व्यवस्थेची दर्डा यांनी पाहणी केली. सर्वच भागातील काम उत्तम असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. मोखा यांनी सभागृहाच्या बांधकामासोबतच तांत्रिक बाबींची माहिती दिली. सभागृहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. फिनिशिंगचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.दोन हजार क्षमतेचे भव्य प्रेक्षागृह असून तळ मजल्यावर १४०० प्रेक्षक तर ६०० प्रेक्षक क्षमतेची बाल्कनी आहे. २५ मीटर रुंदीचा व ३०० चौ.मी.चा भव्य प्रेक्षागृह मंच आहे. १२ ग्रीन रुम व २ व्हीआयपी रूमची व्यवस्था आहे. सभागृहाच्या टेरेसवर २०० के.व्ही. सौर ऊर्जा निर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्युत खर्चात बचत होणार आहे. यावेळी मे.सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीचे सुरेश पटेल व कुणाल भिसीकर यांनीही सभागृहातील कामाविषयी माहिती दिली.पश्चिम नागपुरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंतराव देशपांडे सभागृह आहे. परंतु आता सुरेश भट सभागृहामुळे मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरातील लोकांची सुविधा होणार आहे. पश्चिम नागपूरप्रमाणे या भागातही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शक्य होईल. या माध्यमातून कलावंतांना नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. १५ आॅगस्टपूर्वी सभागृहाचे लोकार्पण होणार आहे.विजय दर्डा यांनी केलेल्या सूचनाप्रेक्षागृह अप्रतिम आहे. परंतु यात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व कॅमेरामन यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था असावी. या भव्य वास्तूवर तिरंगा झेंडा उभारल्यास वास्तूच्या सौंदर्यात अधिक भर पडेल. तळघरात २०० कार, ६०० स्कूटर व ६०० सायकल पार्किंग, व्हीआयपी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे परंतु ही पुरेशी नाही. ४० टक्के जागा ही कार पार्किंगसाठी ठेवायला हवी. दिव्यांगांसाठी पहिल्या माळ्यावर व्यवस्था करण्यात आली आहे. ती तळमजल्यावर असावी, अशी सूचना विजय दर्डा यांनी अशोक मोखा यांना केली.
कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:25 AM
रेशीमबाग मैदानात महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले कविवर्य सुरेश भट सभागृह हा वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना आहे.
ठळक मुद्दे विजय दर्डा यांनी दिली भेट : उपराजधानीच्या वैभवात भर