नागपूर : लहानपणी मुलांचा वेळ खेळण्यात, टीव्ही बघण्यात मस्ती करण्यात जातो मात्र, उपराजधानीतील लिटील वंडर काव्य अग्रवालने वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी किडटास्टिक नावाची भगवद्गीता लिहली. आपल्या पुस्तकात त्याने अगदी सरळ सोप्या भाषेत मांडणी केली. असे करणारा काव्य हा सर्वात छोटा लेखक ठरला असून त्याचे नाव एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविले गेले आहे. त्याच्या या कामगिरीने नागपुरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय.
काव्य सेंटर पॉइंट स्कूलचा विद्यार्थी आहे. लहान वयातच भगवद्गीतेबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याकडे त्याचा कल होता. नंतर त्याने भगवद्गीतेवरील कार्यशाळा पूर्ण केली. ज्यातून त्याला संस्कृत श्लोक शिकण्यास व वाचण्यास अधिक मदत मिळाली. सोबतच, भगवद्गीतेबाबत सखोल माहिती मिळाली. यातूनच त्याने प्रेरणा घेऊन आई-वडील व आजी-आजोबांच्या सहकार्याने किडटास्टिक नावाची भगवद्गीता अवघ्या दोन महिन्यात लिहुन काढली.
काव्य जिथे जातो तिथे तो आपल्या सोबत श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन जातो. भगवद्गीता व श्रीकृष्ण यांना काव्य आपली प्रेरणा मानतो. काव्य संस्कृत श्लोक आणि कविताही सादर करतो. तो योगाचा राष्ट्रीय विजेतादेखील आहे. याशिवाय त्याने बंगाल बोर्डातून शास्त्रीय संगीताची परीक्षादेखील पास केली आहे. त्याचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून तो उत्कृष्ठ वक्तदेखील आहे. आतापर्यंत त्याला २०० पारितोषिकेही मिळाली आहेत. असा हा लिटिल वंडर काव्य नागपुरचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मान वाढविला आहे.