नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने शुक्रवारी दहावी व बारावीचे निकाल जाहीर केले. दाेन्ही परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. दहावी परीक्षेत काेराडी राेडवरील पाेद्दार वर्ल्ड स्कूलची काव्या गुप्ता ९९.६ टक्के गुणांसह नागपूरात टाॅपर ठरली आहे. बारावीच्या विज्ञान विभागात स्कूल ऑफ स्काॅलर, अत्रे ले-आउटचा ओमप्रकाश बरीक हा ९८.२० टक्के गुणांसह अव्वल आला आहे.
बारावीच्या परीक्षेत नागपूर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले आहे. विज्ञान, वाणिज्य व मानव्यशास्त्र विषयात ९० टक्क्याच्या वर निकाल लागला. अनेक महाविद्यालयांनी शंभरीही गाठली आहे. विज्ञान शाखेत ओमप्रकाश बरीक शिवाय वाणिज्य शाखेत भवन्स, सिव्हील लाईन्सची महिता गुप्ता प्रथम आणि हर्षिता शर्माने संभाव्य द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मानव्यशास्त्र शाखेत सेंटर पाॅइंट स्कूल, वर्धमाननगरचा अभिनव साेमानी यांनी अव्वल स्थान पटकाविले आहे. श्रीकृष्णनगर भवन्स येथील कनकलता विष्णू बांबल हिने ९७.२ टक्के गुणांसह संभाव्य दुसरे स्थान प्राप्त केले आहे.
दहावीच्या परीक्षेत काव्या गुप्ता नंतर आष्टी भवन्सचा देवांश डोका हा विद्यार्थी ९९.४ टक्के गुण घेऊन संभाव्य द्वितीय स्थान मिळविले. तर सेंट पॉल शाळेचा साहील सोनी हा ९९ टक्के गुण घेऊन संभाव्य तिसरा राहिला. नारायणाची आरोही उके आणि सांदिपनीचा चक्रवर्ती हे सुद्धा ९९ टक्के गुण घेऊन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत.
१२ वीच्या परीक्षेत ४४ हजारावर विद्यार्थ्यांनी ९५ टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त केेले. एकूण निकालाचा विचार केला तर ८७..३३ टक्के विद्यार्थ्यांनी १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षेत ८४.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ९०.६८ टक्के विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या. तसेच १.१२ लाख विद्यार्थ्यांनी ९० टक्के गुण प्राप्त केले. दुसरीकडे दहावीच्या परीक्षेत २१ लाख ८६ हजार ९४० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची टक्केवारी चांगली राहिली. ९४.२५ टक्के मुली तर ९२.७२ टक्के मुलं या परीक्षेत यशस्वी ठरले. म्हणजेच मुलांच्या तुलनेत मुली १.९८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या.
- आचानक लागल्याने शाळांचा गोंधळ
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात गेल्या चार पाच दिवसांपासून चर्चा होतीच. पण शुक्रवारी अचानक दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला आणि त्या पाठोपाठच दहावीचाही निकाल सीबीएसईने जाहीर केला. अचानक लागलेल्या निकालामुळे टक्केवारी काढण्यात शाळांचा गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांनाही अचानकच निकालाची माहिती मिळाल्याने ते ही आश्चर्यचकित होते. रात्री उशीरापर्यंत शाळेतील शिक्षक निकालाच्या गडबडीतच होते.