नागपूर : राजकीय पक्षाशी जुळलेल्या रिपब्लिकन पक्षाला पुन्हा एकत्रिकरणाचे वेध लागले आहे. यावेळी एकीसाठी बहुजन रिपब्लिकन एकता मंचाने (बरिएएम) पुढाकार घेतला आहे. बरिएएमच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, राजेंद्र गवई, आनंदराज आंबेडकर एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाचे नेत्यानुसार गट पडले. परिणामी रिपब्लिकन नेते जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. नेत्यांच्याही हातात अपेक्षित यश लागले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रिपब्लिकन नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संस्थापक अध्यक्ष अॅड. सुलेखा कुंभारे यांनी सुरू केला आहे. पक्षाचा ११ एप्रिलला ९ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्त माहेश्वरी सभागृह, सीताबर्डी येथे जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना आमंत्रित केले आहे. त्याचबरोबर माजी आमदार वामनराव चटप, अल्पसंख्यांकाचे नेते शब्बीर विद्रोही, भोई समाजाचे अॅड. दादासाहेब वलथरे, अॅड. नंदा पराते अशा विविध संघटनांचे नेतेही या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विदर्भ राज्याची निर्मिती, इंदू मिलच्या जागेवर जागतिक दर्जाचे स्मारक, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना स्थायी स्वरूपात मदत, महिलांची सुरक्षा, विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण यावरही चर्चा होणार असल्याचे सुलेखा कुंभारे म्हणाल्या. बाबासाहेबांचे स्वप्न व रिपब्लिकन जनतेचा विकास हे बरिएएमचे उद्दिष्ट आहे. रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणून समाजाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय विकास होत असेल, तर चांगली बाब असल्याचे कुंभारे म्हणाल्या. (प्रतिनिधी)
कवाडे, आठवले, गवई, आंबेडकर एकाच व्यासपीठावर
By admin | Published: April 08, 2015 2:38 AM