लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खून प्रकरणातील एका आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. ही घटना लकडगंज पोलिसांच्या हद्दीतील आहे.सचिन हरिनारायण पावनकर (२९) असे आरोपीचे नाव असून, तो लालगंज येथील रहिवासी आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने पावनकर व बारईपुरा येथील मनीष देवनाथ सदावर्ते (३१) यांना जन्मठेप व ३००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. बस्तरवारी येथील दीपक गुलाब ढोबळे (३५) याला एक वर्ष कारावास व १००० रुपये दंडाची शिक्षा झाली होती. याशिवाय इतर काही आरोपींनाही शिक्षा झाली होती व काहींना निर्दोष सोडण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या तीन आरोपींचे या शिक्षेविरुद्धचे अपील एकत्र ऐकले. त्यानंतर विविध बाबी लक्षात घेता, पावनकर व ढोबळेचे अपील फेटाळून त्यांची शिक्षा कायम ठेवली तर, सदावर्तेचे अपील मंजूर करून त्याला निर्दोष सोडले. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. राज्य सरकारतर्फे अॅड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.अशी घडली घटनामयताचे नाव सुमित श्रीवास होते. ही घटना २१ मे २०१३ रोजी रात्री ११ च्या सुमारास घडली. कावरापेठ रेल्वे फाटकाजवळ आरोपी मंगेश बिनेकरच्या मोटरसायकलचा मयत सुमितच्या मोटरसायकलला धक्का लागला. त्यामुळे सुमितने मंगेशला थापड मारली. त्यानंतर प्रकरणातील सर्व आरोपींनी सुमितवर हल्ला करून त्याचा चाकू भोसकून खून केला