नागपूर : क्रीडामंत्री सुनील केदार व माजी आमदार आशिष देशमुख यांच्यातील परंपरागत राजकीय युद्ध पुन्हा एकदा उफाळले आहे. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केल्यानंतर केदार यांनी दिल्लीत हायकमांडकडे धाव घेतली आहे. राज्यात मंत्री असलेल्या आपल्याच पक्षाच्या नेत्यावर आरोप करून अप्रत्यक्षपणे पक्षाला व सरकारला अडचणीत आणू पाहणाऱ्या देशमुख यांची त्वरित हकालपट्टी करा, अशी मागणी केदार हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची भेट घेऊन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
एका खुर्चीवरून केदार - देशमुख यांच्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे.
काटोलच्या आढावा बैठकीत शेजारच्या खुर्चीत बसलेल्या देशमुख यांना केदार यांनी सर्वांसमक्ष उठविले. खुर्चीसाठी झालेल्या अपमानातून देशमुख रुसले आणि दुसऱ्याच दिवशी घोटाळेबाज केदार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले. खुर्चीच्या या किस्स्याची राजकीय वर्तुळात खूप चर्चा रंगली आहे. देशमुख यांनी केदार यांच्या विरोधात पत्र लिहिताच जिल्ह्यातील केदार समर्थक चांगलेच भडकले आहेत. देशमुख हे नेहमीच अपरिपक्वपणाने वागतात. कोणत्याही एका मतदारसंघात ते स्थिर नाहीत. सावनेर, काटोल व दक्षिण-पश्चिम असे तीन मतदारसंघ त्यांनी बदलले आहेत.
त्यांच्यामुळे पक्षाचे नेहमीच नुकसान होत आले आहे. आता काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करून देशमुख पुन्हा एकदा विरोधकांना मदत करून पक्ष व सरकारला अडचणीत आणू पाहत आहेत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी करणारी पत्रे केदार समर्थकांनी दिल्ली हायकमांडसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविली आहेत.
अशातच बुधवारी केदार दिल्लीत दाखल झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची भेट घेऊन देशमुख यांची तक्रार करण्याची शक्यता आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा नागपूर काँग्रेसमधील गटबाजी दिल्ली दरबारी पोहोचली आहे.