नागपूर : आमदारांचा विकास निधी आणखी एक कोटीने वाढला आहे. त्यामुळे आमदारांना आता वर्षभरात चार कोटींचा निधी विकासकामांसाठी वापरता येणार आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर सावनेर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे व राज्याचे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री असलेले सुनील केदार आणि माजी गृहमंत्री आणि काटोलचे आमदार अनिल देशमुख हे या वर्षात आमदार निधी खर्च करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. (Kedar-Deshmukh leads in spending MLA funds)
नागपूर जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदार संघ आहेत. यात सहा नागपूर शहरात व ६ ग्रामीण भागात आहेत. आमदारांच्या विकास निधीमध्ये एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ती आता ४ कोटी रुपयापर्यंत पाेहोचली आहेत. प्रत्येक आमदारांनी या वर्षी करावयाच्या कामांचे प्रस्ताव सरकारकडे सादर केले आहेत. त्यातील बहुतांश कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासोबत आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आणि राजू पारवे हे आघाडीवर आहेत.
आमदार निधीतून ही कामे करता येतात
सार्वजनिक हिताची कामे आमदार विकास निधीतून करता येतात. वैयक्तिक लाभाची कामे सोडून सर्व प्रकारच्या सार्वजिनक हिताची कामे. यात प्रामुख्याने रस्ता, वीज आणि नाल्यांची कामे मोठ्या प्रमाणावर असतात हे विशेष. त्यानंतर सार्वजनिक सभागृहे व इतर कामांचा समावेश होतो.
अन्य निधीतूनही माेठ्या प्रमाणावर कामे
काही विधानसभेत आमदार निधी कमी खर्च झाल्याचे दिसून येत असले तरी त्या मतदार संघात संबंधित आमदाराने राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून विकास कामे केली आहे. उदाहरणार्थ उत्तर नागपुरात आमदार निधी कमी खर्च झाल्याचे दिसून येते. मात्र राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचा हा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांनी विविध योजनांद्वारे येथे निधी खर्च केला आहे. इतर मतदार संघातही तसेच चित्र आहे.