संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया : दोषींवर कारवाई करण्याकडे शासनाचा कानाडोळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक’ अशी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख निर्माण झाली होती. या बँकेने प्रशासकाच्या काळात केवळ पारदर्शी कारभारामुळे यशाचे शिखर गाठले. त्यानंतर बँकेवर संचालक मंडळाची निवड करण्यात आली आणि बँकेच्या अध:पतनाला सुरुवात झाली. ही बँक सर्वाधिक काळ आ. सुनील केदार यांच्या छत्रछायेखाली राहिली आहे. त्यामुळे आ. सुनील केदार यांच्या मर्जीतील माणसं या बँकेच्या संचालक मंडळावर निवडून आली, किंबहुना आणल्या गेली. मध्यंतरी आ. केदारांनी या बँकेतील भागभांडवल खासगी कंपन्यांचे रोखे खरेदी करण्यात गुंतविले. हा निर्णय फसल्याने बँक तर डबघाईस आली, परंतु जिल्ह्यातील हजारो शेतकरी क्षणार्धात आर्थिक संकटात ढकलल्या गेले. या बँकेच्या आजच्या अवस्थेला आ. सुनील केदार आणि त्यांच्या मर्जीतील संचालक मंडळ सर्वस्वी जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. शिवाय, दोषींवर कठोर कारवाई करणे क्रमप्राप्त असताना शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. बँकेचा पाया उद्ध्वस्त ही बँक बराच काळ आ. सुनील केदार यांच्या अधिपत्याखाली होती. शेतकऱ्यांना पीककर्ज देताना प्रत्येक वेळी शेअरची रक्कम कर्जातून कपात करण्यात आली. आ. केदार यांनी ही रक्कम अस्तित्वात नसलेल्या काही कंपन्यांमध्ये गुंतविली. त्यामुळे या बॅँकेचा पायाच उद्ध्वस्त करण्याचे काम आ. केदार यांनी केले. एक लाखापर्यंतचे पीककर्ज देणारी ही बँक आता एक रुपयाला महाग झाली आहे. बँक डबघाईस आल्याने आ. केदारांनी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. त्यामुळे शासनाने दोषींवर तडकाफडकी कठोर कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या शेअर्सची रक्कम, ठेवी व खात्यातील पैसा परत करावा. - मदन कामडे, शेतकरी, नरखेड शेतकऱ्यांचे भांडवल परत करा नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शेतकऱ्यांना विश्वास होता. प्रशासकाच्या काळात ही बँक भरभराटीस आली. संचालक मंडळाने मात्र या बँकेची वाट लावली. बँकेच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. मग ती व्यक्ती कितीही मोठी असो. त्यांची संपत्ती विकून बँकेचे भांडवल परत करावे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी या बँकेचा अप्रत्यक्षरीत्या मालक आहे. - देवेंद्र देशमुख, शेतकरी, काटोल बँक खातेदारांची फसवणूक ही बँक शेतकऱ्यांसाठी देवदूत होती. आ. सुनील केदार यांनी घोटाळा करून शेतकऱ्यांसह इतर खातेदारांची फसवणूक केली. सध्या पीककर्ज घेतल्याशिवाय शेती करणे शक्य नाही. जिल्हा बँक डबघाईस आल्याने इतर बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकेचे उंबरठे झिजवायला लावले. या घोटाळ्यात आ. सुनील केदार दोषी असूनही शासन त्यांच्याविरुद्ध काहीही कार्यवाही करायला तयार नाही. शासनाने किमान शेतकऱ्यांसह इतर खातेदारांची रक्कम आणि विश्वास परत करावा. - अरविंद चिकनकर, शेतकरी, भानेगाव, ता. सावनेर कर्ज घेण्यासाठी मनस्ताप ही बँक बंद पडल्याने चार वर्षांपासून शेतकऱ्यांना इतर बँकांकडून नव्याने पीककर्ज मिळविण्यासाठी अक्षरश: मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना सावकारांकडे जावे लागले. वेळीच कर्ज न मिळल्याने काही शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. आ. सुनील केदार यांच्या कार्यकाळात या बँकेत मोठा आर्थिक घोटाळा झाल्याने बँकेची आज ही अवस्था झाली आहे. त्यामुळे शासनाने दोषींवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. - दिलीप मुळे शेतकरी, गुमथळा, ता. कामठी. गतवैभव प्राप्त करून द्यावे आ. सुनील केदार यांनी ही बँक डबघाईस आणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारांकडे हात पसरायला लावले. याला केदारांसोबतच शासनही जबाबदार आहे. आर्थिक घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांचा या बँकेवरील विश्वास उडाला आहे, याचे वैषम्य कुणालाही नाही. शासनाने दोषींवर कारवाई करावी तसेच या बँकेला गतवैभव प्राप्त करून द्यावे. - सुधाकर राऊत, शेतकरी, द्रुगधामना, ता. नागपूर (ग्रामीण) बँकेची ओळख धुळीस मिळाली चुकीच्या धोरण आणि निर्णयामुळे या बँकेची शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची बँक अशी ओळख धुळीस मिळाली. १२४.६० कोटी रुपयांचा रोखे खरेदी निर्णय अंगलट आला. त्यामुळे बँकेसह शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलण्यात आले. या प्रकाराला आ. सुनील केदारांसोबत तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी. - प्रमोद गमे, शेतकरी, येरला. शेतकऱ्यांना संकटात ढकलले माझे या बँकेच्या मांढळ शाखेत तीन लाख रुपये जमा आहेत. त्यातील १० हजार रुपयांची उचल करण्यासाठी मला महिनाभर बँकेच्या दारात जावे लागले. खात्यात पैसा जमा असूनही पिकांच्या मशागतीसाठी इतरांकडून पैसा गोळा करावा लागला. ही माझीच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची व्यथा आहे. बँकेच्या संचालक मंडळाने निर्दोष शेतकऱ्यांना स्वत:च्या स्वार्थासाठी संकटात ढकलले. - गुलाब चवडे, शेतकरी, अडम, ता. कुही. मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळाले नाही जिल्हा बँकेच्या रामटेक शाखेत आपण सहा वर्षांपूर्वी २ लाख ३० हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले होते. आर्थिक घोटाळ्यामुळे बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. माझ्या मुलीचे लग्न जुळले असून, लग्नाची तारीख जवळ येत आहे. मी बँकेकडे वारंवार पैशाची मागणी केली. परंतु, माझी कैफियत ऐकून घ्यायला कुणी तयार नाही. उसणवार करून व्यवहार पूर्ण करावे लागत आहे. बँकेच्या या अवस्थेला आ. सुनील केदार जबाबदार अरताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही? - लखन
केदारांनीच बुडविली जिल्हा बँक
By admin | Published: May 14, 2017 2:21 AM