सोपान पांढरीपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही बँकेचा अध्यक्ष हा बँकेतील सार्वजनिक पैशांचा रखवालदार असतो, ही बाब सुनील केदार विसरले व त्यांनी नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरणे सुरू केले व शेवटी बँकेला १५० कोटीच्या खड्ड्यात लोटले.
सरकारी कर्जरोख्यांचे व्यवहार कसे होतात?सरकारी कर्जरोखे हे कमी व्याज मिळणारे व दीर्घ मुदतीचे गुंतवणूक रोखे असतात. बँकांनी तरलता निधीची (एसएलआर) पूर्तता समजली जाते म्हणून बँका हे रोखे विकत घेत असतात. हे रोखे विकत घेण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेला पैसे देतात व रिझर्व्ह बँक त्या रोख्यांची नोंद बँकेच्या नावाने कान्स्टिट्यूअेंट सब्सिडिअरी जनरल लेजर (सीएसजीएल) या रजिस्टरमध्ये करते. हा संपूर्ण व्यवहार डीमॅट स्वरूपात असल्याने बँकेच्या अध्यक्ष वा अधिकाऱ्यांना यात पैशाची अफरातफर करता येत नाही.केदारांनी सीएसजीएल डावललेसुनील केदार यांना बँकेचा पैसा वापरून स्वत:चे खिसे भरायचे असल्याने, त्यांनी सरकारी कर्जरोखे सीएसजीएलमार्फत खरेदी न करता दलालांमार्फत खरेदी करणे सुरू केले. यात फायदा असा होता की, बँकेच्या पैशावर दलाल शेअर बाजारातून सरकारी कर्जरोखे प्रत्यक्ष स्वरूपात खरेदी करत. स्वस्तात घेतलेले हे रोखे अधिक किमतीला विकून दलाल व सुनील केदार नफा कमवत असत. अशाप्रकारे दोन ते तीनवेळा बँकेच्या पैशावर नफा कमवून झाला की मग दलाल रोखे बँकेत जमा करत असत.संपूर्ण २००१ व २००२ असे दोन वर्ष सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेच्या पैशावर स्वत:ची तुंबडी भरत होते. २००१ साली बँकेला या व्यवहारात पाच कोटी नफा झाला, तर २००२ साली २० कोटी नफा झाला. यापैकी सहा ते सात कोटी केदारांच्या खिशात गेल्याचा अंदाज आहे.कर्जरोख्यांच्या या गोरखधंद्यात सुनील केदार इतके गाफील झाले होते की बँकेला रोखे मिळाले किंवा नाही, हे ते तपासूनही बघत नव्हते.सुनील केदार बीएस्सी (कृषी) व एमबीए शिकलेले आहेत. त्यांच्या याच फाजील आत्मविश्वासाचा फायदा दलालांनी रोखे बँकेला देण्यात टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे जानेवारी/फेब्रुवारी २००२ मध्ये दिलेल्या १५० कोटींचे रोखे बँकेला एप्रिल २००२ मध्येही मिळाले नव्हते व त्याबद्दल केदार पूर्णत: गाफील होते. शेवटी बँकेला १५० कोटींचे कर्जरोखे मिळालेच नाही व केदारांवर जेलयात्रा करण्याची वेळ आली. पण एवढे होऊनही केदार मात्र निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखे दर विधानसभा निवडणुकीत उभे राहत आहेत व सावनेरची आमदारकी उपभोगत आहेत.