लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील बहुतांश संजय गांधी निराधार अनुदान योजना समित्यांची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. मात्र, सावनेर, पश्चिम नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपूर या मतदारसंघातील समित्यांची घोषणा होऊ शकली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा मंत्री सुनील केदार व आमदार विकास ठाकरे यांना आपल्या मतदारसंघातील समितीमध्ये पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप नको आहे. पक्षांतर्गत गटबाजीतूनच या दोन्ही मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या असल्याची माहिती आहे.
विधानसभा व तहसील स्तरावर गठित या समितीच्या सदस्यांच्या नावांची यादी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयााने जारी केली. या यादीनुसार पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रासाठी स्थापित समिती अध्यक्षपदी शेख अयाज यांना नेमण्यात आले आहे. शेख अयाज माजी पालकमंत्री सतीश चतुर्वेदी यांच्या जवळचे मानले जातात. त्याचप्रकारे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील समितीच्या अध्यक्षपदी दीपक खोब्रागडे यांची नियुक्ती केली आहे. रमेश नानवटकर हे दक्षिण नागपूर व जुल्फेकार अली भुट्टो यांना मध्य नागपूरचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी त्यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील समितीच्या सदस्यांची नावेच दिलेली नाहीत, त्यामुळे नियुक्ती झाल्या नाहीत, असा दावा पालकमंत्री समर्थकांकडून करण्यात आला आहे.
महिनाभरापूर्वीच नावांची यादी दिली
समितीच्या स्थापनेत कुठलीही गटबाजी नाही. एक महिन्यापूर्वीच नावांची यादी दिली आहे. त्यामुळे पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील समितीची घोषणा लवकरच केली जाईल.
आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष काँग्रेस