कमलेश वानखेडे
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुरु असलेल्या राजकीय वादात आता माजी मंत्री सुनील केदार यांनी उडी घेत थोरात यांनी पाठराखण केली आहे. ज्या कुटुंबाच्या दोन पिढींनी काँग्रेससाठी सर्वस्व पणाला लावले, त्यांच्याबाबत निर्णय घेताना थोडे थांबून, समजून त्यांची भेट घेऊन, राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता, अशी उघड भूमिका केदार यांनी मांडली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना केदार म्हणाले, थोरात हे संयमी नेते आहे. महाविकास आघाडीचे सरकार चालविण्यात त्यांनी चांगली भूमिका वठवली. पक्षात शिस्त असलीच पाहिजे. पण काही वेळा थोडा सबुरीने निर्णय घ्यायला हवा. तडकाफडकी निर्णय घेणे आज महाराष्ट्रात पक्षाला झेपणारे आहे का ? प्रसार माध्यमांकडे न जाता पक्षाच्या व्यासपीठावर एकत्र येऊन बैठक घेऊन मार्ग काढायला हवा. नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून नव्हे तर काँग्रेसचा सिपाही म्हणून स्वत: थोरात यांची भेट घ्यावी व विषय समजून घ्यावा, असा सल्ला देत १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत टीळक भवनात आयोजित प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत या विषयावर आपण भूमिका मांडू, असेही केदार यांनी स्पष्ट केले. दिल्लीकडे जावून प्रश्न सोडविण्यापेक्षा आम्ही राज्यातच एकत्र बसून प्रश्न सोडवू. पक्षाचे प्रश्न चार भिंतीच्या आतच सोडविले पाहिजे, यावरही केदार यांनी भर दिला. राहुलजी सांगतात, नफरत छोडो, हाथ से हाथ जोडो. हे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने समजून घेण्याची गरज आहे, असा चिमटाही केदार यांनी काढला.