हायकोर्टात याचिका : राज्याचे मुख्य सचिवांसह इतरांना नोटीस नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा नागपूर हा गृह जिल्हा असल्यामुळे येथे होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या प्रक्रियेपासून त्यांना लांब ठेवण्यात यावे किंवा त्यांची बदली करण्यात यावी अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. सतीश उके असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी सोमवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्याचे मुख्य सचिव, भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, नागपूर विभागीय आयुक्त व नागपूर जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून ८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. कुर्वे यांनी नागपुरातील विविध शाळांमध्ये व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यामुळे नागपूर हा त्यांचा गृह जिल्हा ठरतो. ‘यूपीएससी’द्वारे निवड झाल्यानंतर त्यांना उत्तराखंड येथे नियुक्ती देण्यात आली होती. १७ डिसेंबर २०१४ रोजी ते पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले. २० मे २०१५ रोजी त्यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी शिक्षक मतदार संघासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुर्वे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. कुर्वे यांच्यावर विविध गंभीर आरोप आहेत. त्यांचा इतिहास पाहता निवडणुका पारदर्शी होण्याची शक्यता कमी आहे. परिणामी, १६ व १७ जानेवारी रोजी याचिकाकर्त्याने सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कुर्वे यांची बदली करण्याची मागणी केली होती, पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री व मुख्य सचिवांना निवेदन सादर करण्यात आले. त्याचाही काहीच फायदा झाला नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांना निवडणुकांपासून लांब ठेवा
By admin | Published: January 31, 2017 3:03 AM