नागपूर : मुळात नागपूर जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन फार कमी घेतले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या गरजेपुरत्या कांद्याची दरवर्षी लागवड करतात. यावर्षी जिल्ह्यात अंदाजे १०० हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत कांद्याचे लागवड क्षेत्र घटले आहे. याला कांदा साठवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी यंत्रणेचा अभाव, प्रतिकूल वातावरणामुळे घटत असलेले उत्पादन, बाजारात मिळणारा कमी भाव आणि बियाण्यांचे वाढते दर या बाबी कारणीभूत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी त्यांच्या कुटुंबाची गरज भागविण्यासाठी अर्धा-एक गुंठा शेतात दरवर्षी कांद्याची लागवड करतात. शिवाय, चांगले उत्पादन झाल्यास अतिरिक्त कांद्याची बाजारात विक्री करतात. एकर, दीड एकर किंवा एका हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करणारे शेतकरी जिल्ह्यात बाेटावर माेजण्याइतकेच आहेत. जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला प्रथम पसंती दिली जात असल्याने शेतकरी पांढऱ्या कांद्याचीच लागवड करतात. मागील काही वर्षांत एकात्मिक फलाेत्पादन विकास अभियानांतर्गत नागपूर जिल्ह्यात १० कांदाचाळी उभारण्यात आल्या आहेत, अशी माहिती अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.
कांदा बियाणे दीड हजारावरून तीन हजारांवर
कांद्याचे बियाणे महागात खरेदी करावे लागत असल्याची माहिती काही कांदा उत्पादकांनी दिली. मागील वर्षी आपण कांद्याचे १,६०० ते १,८०० रुपये प्रतिकिलाेने खरेदी केले हाेते. यावर्षी मात्र त्याच बियाण्यांचे दर २,७०० ते २,९९५ रुपये प्रति किलाे झाल्याचे त्यांनी सांगितले. कांदा उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर कृषी निविष्ठांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च ३५ रुपये प्रति किलाेपेक्षा अधिक असून, बाजारात मात्र तेवढा दर मिळत नाही. त्यामुळे कांद्याचे उत्पादन घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कांदा उत्पादकांनी सांगितले.
कांदा लागवडीचे क्षेत्र घटले
नागपूर जिल्ह्यात कांद्याचे लागवड फारच कमी क्षेत्रात केली जाते. कांदा नाशिवंत असल्याने तसेच ताे व्यवस्थित साठवून ठेवण्याची प्रभावी साेय नसल्याने आपण कांद्याची माेठ्या प्रमाणात लागवड करीत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मागणी वर्षी जिल्ह्यात अंदाजे १६५ हेक्टरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली हाेती. यावर्षी हे क्षेत्र १०० हेक्टरवर आले आहे.
गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांना फटका
कांदा महत्त्वाचे पीक असले तरी केंद्र सरकार वेळावेळी दर नियंत्रित करण्यासाठी निर्यातबंदीसह इतर बंधने लादते. त्यामुळे कांद्याचे दर पडतात. अनेकदा कांदा विक्रीतून उत्पादनखर्च देखील भरून निघत नाही. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे कांद्याचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन कमी हाेत असून, त्याचा फटका ग्राहकांना बसताे.
व्यापारी करतात माेठी गुंतवणूक
नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील अकाेला व नाशिक जिल्ह्यासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांमधून कांदा विक्रीसाठी येताे. या कांद्याच्या वाहतूक व साठवणुकीवर माेठा खर्च करावा लागताे. वेअरहाऊसमध्ये साठवून ठेवलेला कांदा मागणीनुसार टप्प्याटप्प्याने बाजारात विक्रीसाठी काढला जाताे. त्यासाठी माेठी गुंतवणूक करावी लागत असून, प्रसंगी त्यावरील व्याजाचा भरणा करावा लागताे. मात्र, या सर्व प्रक्रियेत व्यापाऱ्यांनाच दाेष दिला जात असून, ते मालामाल हाेत असल्याचे सांगितले जाते. वास्तव वेगळे असल्याचे काही कांदा व्यापाऱ्यांनी सांगितले.
नुकसान भरपाईबाबत आग्रही नाही
जिल्ह्यात कांद्याचे लागवड क्षेत्र नगण्य आहे. शिवाय, रब्बीचे एकमेव पीक घेतले जाते. मागील वर्षी रब्बी हंगामात कांद्याचे फारसे नुकसान झाले नाही. अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास क्षेत्र कमी असल्याने नुकसानीची तीव्रता व प्रमाणही कमी असते. त्यामुळे आपण नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आग्रही नसताे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यात कांद्याचे खरीप हंगामात पीक घेतले जात नसल्याने नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत कांद्याचा समावेश नसताे, असे कृषी विभागातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.
शहरी ग्राहकांना कमी दरात कांदा व इतर भाजीपाला हवा असताे. कृषी निविष्ठा आणि वाहतुकीचे दर वाढल्याने कांद्याचा उत्पादन खर्च भरून निघेल, एवढाही दर मिळत नाही. त्यामुळे आपण कांद्याचे माेठ्या प्रमाणात पीक घेत नाही.
- विनायक वाडबुदे, शेतकरी
शेतमालाचे दर वाढल्यास महागाई वाढल्याच्या बाेंबा ठाेकल्या जातात. त्यातून केंद्र व राज्य सरकार वाढलेले दर कमी करण्यासाठी शेतमालावर विविध बंधने लादते. याला कांदाही अपवाद नाही. त्यामुळे आपण स्वत:च्या गरजेपुरते कांद्याचे उत्पादन घेताे.
- संजय वानखेडे, शेतकरी.