लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारदर्शकता ठेवा, नियमित कर भरा आणि आदर्श व्यापार करीत सुखाची झोप घ्या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे व्यापाऱ्यांना केले.राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे शुक्रवारी सिव्हील लाईन्स येथील चेंबर कार्यालयाच्या पटांगणात बनवारीलाल पुरोहित यांचे स्वागत व अभिनंदनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाल, पुष्पहार व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी व माजी अध्यक्ष प्रकाश मेहाडिया व्यासपीठावर होते.राज्यपाल बनवारीलाल पुरोहित म्हणाले, व्यापार करायला हवा, परंतु तो आदर्श असायला हवा. पूर्वी कमाईचा ८० टक्के भाग कराच्या रुपात भरावा लागत होता. आता तशी परिस्थिती नाही. केवळ ३० टक्के कर भरावा लागतो हा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो. त्यामुळे आपल्या कामात पारदर्शकता ठेवा, नियमित कर भरा. आपण आपल्या कुटुंबाचे विश्वस्त आहोत. पत्नी, मुलं आई वडील यांची जबाबदारी आपल्यावर आहे. तेव्हा कुटुंबाला काही त्रास होईल, असे वागू नका. त्यांच्याशी प्रामाणिक राहा, असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.यावेळी विविध व्यापारी आणि सामाजिक संघटनांच्यावतीने बनवारीलाल पुरोहित यांचा सत्कार करण्यात आला.हेमंत गांधी यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बी.सी. भरतीया यांनी परिचय करून दिला. संजय अग्रवाल यांनी संचालन केले. अर्जुनदास आहुजा यांनी आभार मानले.यावेळी गिरीश गांधी, नगरसेविका प्रगती पाटील, रुपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, सुनील अग्रवाल, संजय बंगाले, राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित, ज्ञानेश्वर रक्षक, अतुल कोटेचा यांच्यासह व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.तामिळनाडूमुळे इंग्रजी पक्की झालीमाझे संपूर्ण शिक्षण व कार्य हे हिंदी भाषेतच राहिले आहे. आसामचा राज्यपाल झाल्यावरही भाषेची कुठली अडचण आली नाही हिंदी भाषेत काम चालत होते. परंतु तामिळनाडूमध्ये मात्र हिंदीची अडचण येते. तेथील नगरिकांना तामिळ व इंग्रजी भाषाच समजते. त्यामुळे तिथे गेल्यापासून मला इंग्रजीच बोलावे लागत आहे. त्याचा एक फायदा म्हणजे माझी इंग्रजी चांगलीच पक्की झाल्याचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यावेळी सांगितले.
पारदर्शकता ठेवा, आदर्श व्यापार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:43 AM
पारदर्शकता ठेवा, नियमित कर भरा आणि आदर्श व्यापार करीत सुखाची झोप घ्या, असे आवाहन तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी येथे व्यापाऱ्यांना केले.
ठळक मुद्देराज्यपाल बनवारीलाल पुरोहित : नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे सत्कार