काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी : वडगाव जलाशयात १० टक्के जलसाठा शिल्लकबुटीबोरी : उमरेड तालुक्यातील बेला शिवारात असलेल्या वडगाव धरणातील पाणी बुटीबोरी येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना दिले जाते. या धरणात सध्या १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. आगामी काही दिवसांत उद्भवणारी पाणीसमस्या विचारात घेता, या धरणातील उद्योगांच्या वाट्याच्या पाण्यात कपात करून ते परिसरातील गावांमधील नागरिकांना पिण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण यांनी सिंचन विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. वडगाव धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात उद्योगाला दिले जाते. वाढत्या तापमानामुळे या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. या भागात पाणीसमस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाला नियोजित वेळी सुरुवात न झाल्यास बेला व बुटीबोरीसह परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी दिवसातील पाणीसमस्या विचारात घेता सिंचन विभागाने या धरणातील उद्योगाच्या वाट्याच्या पाण्यात कपात करावी, ते नागरिकांना पिण्यासाठी राखून ठेवावे, अशी मागणी मिुख्य अभियंता रमेश ढवळे व अधीक्षक अभियंता वसंत बोरकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मुजीब पठाण यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात बाळू ठाकरे, शरत पत्ती, धर्मेंद्र मिश्रा, शोएब शेख, सुरेश वलीवकर, राजू गावंडे, योगेश सातपुते, आशिष वरघने, राहुल पटेल, युसूफ शेख, शकील खान, नासीर शेख, इस्माईल खान यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवा!
By admin | Published: May 26, 2016 3:03 AM