लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. गुरुवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या एका हृदयरोगाच्या महिलेला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल सहा तास ताटकळत ठेवले. वरिष्ठांचा वचक नसल्याने येथे मनमानेलपणा सुरू असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. शासनाने या योजनेत खंड न पडू देता १ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना हे नवे नाव देऊन योजना सुरू ठवेली. नाव बदलल्याने योजनेता नवे उपचार व शस्त्रक्रियांची भर व अनुदान अडीच लाखापर्यंत वाढविण्याची शक्यता होती. परंतु आता वर्ष होत असताना कुठलाही बदल झालेला नाही. यातच नागपुरात या योजनेचे कार्य टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) पॅरामाऊंट कंपनीकडून काढून नव्या कंपनीला देण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थींना मंजुरी मिळण्यापासून ते रुग्णालयातून सुटी घेण्यासाठीचे सर्व सोपस्कार रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना तासन्तास कार्यालयात घालवून पार पाडावे लागत आहे.गुरुवारी मीना मोंडेकर ही हृदयविकाराची रुग्ण ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी सकाळी ८ वाजतापासून कार्यालयात येऊन बसली. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ती भरती आहे. मात्र कार्यालयातील आरोग्य अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांनी सहा तास ताटकळत ठेवत दुपारी ३ वाजता तिचे नाव योजनेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली. असे प्रकार येथे रोजच होत असल्याचे येथील एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले. या उलट मेडिकल आहे. तिथे योजनेच्या कार्यालयात रुग्णांना न बोलविता आरोग्य मित्र किंवा निवासी डॉक्टर त्यांचे काम पाहतात. ‘सुपर’ला नवे ‘ओएसडी’ मिळाले आहेत, त्यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
नागपुरातील सुपर स्पेशालिटीत रुग्णाला ठेवले सहा तास ताटकळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:24 AM
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे.
ठळक मुद्देकामचुकारपणामुळे रुग्णांना फटका