लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे हिंसाचारच : उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 05:14 PM2022-08-04T17:14:50+5:302022-08-04T17:20:13+5:30
प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे.
राकेश घानोडे
नागपूर : काेणतेही ठोस कारण नसताना लग्नाच्या सुरुवातीपासून पत्नीला सासरी एकटे ठेवणे व पतीने दुसऱ्या गावात एकटे राहणे, ही कृती कौटुंबिक हिंसाचारात मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी एका प्रकरणात दिला, तसेच पत्नी व तिच्या मुलीला मासिक आठ हजार रुपये खावटी मंजूर केली.
प्रकरणातील पती पोलीस कर्मचारी असून तो अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील रहिवासी आहे. ११ जून २०११ रोजी लग्न झाल्यानंतर तो नोकरीचे ठिकाण असलेल्या वणी येथे एकटाच निघून गेला. त्याने पत्नीला सासू-सासऱ्यासोबत ठेवले. सासू-सासरे पत्नीचा सतत छळ करीत होते. तिला गुलामासारखे वागवीत होते. सासरा तिच्यावर वाईट नजर ठेवत होता.
दरम्यान, पत्नीने आग्रह केल्यामुळे पतीने तिला डिसेंबर-२०११ मध्ये वणीला नेले. तेथे गेल्यानंतर पतीचे अनैतिक संबंध असल्याचे काही पुरावे पत्नीला मिळाले. तिने त्यासंदर्भात विचारपूस केली असता, पतीने तिला जबर मारहाण केली व पुन्हा सासरी आणून सोडले. त्यावेळी ती अधिक काळ छळ सहन करू शकली नाही व मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. या बाबींवरून कौटुंबिक हिंसाचार सिद्ध होतो, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले.