शीलेष शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुजरातमधील यशानंतर आता गोव्यासह संपूर्ण देशात विस्तार करण्याची तयारी करत आहेत. केजरीवाल यांनी आपल्या मनातील ही बाब ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांना दिल्लीत आयोजित ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान सांगितली.
दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नांची केजरीवाल यांनी उत्तरे दिली. सरकारच्या लोकप्रियतेचे गमक काय आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, आम्ही नेहमी सामान्य व्यक्तीच्या मुद्द्यांना प्राधान्य दिले. जनतेचे शिक्षण, आरोग्य, वीज-पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांना पूर्ण करण्यासाठी सरकारी आस्थापनांचा सदुपयोग केला. अगोदरच्या शासनकर्त्यांकडून या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होते. दिल्लीच्या अर्थसंकल्पातील २५ टक्के निधी शिक्षण व १५ टक्के निधी आरोग्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला. सरकारी शाळांना खासगी शाळांहून उत्कृष्ट बनविले व प्रत्येक दिल्लीकरासाठी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. सरकारी शाळांच्या शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षणासाठी जगातील इतर देशांमध्ये पाठविले. सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे, यासाठी आयआयएम-अहमदाबादसारख्या देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्थेतून प्रशिक्षण मिळण्याचीही व्यवस्था केली. जर दुसऱ्या राज्यांतील शासनांनी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या, तर तेही दिल्ली सरकारप्रमाणे लोकप्रिय होऊ शकतात, असे केजरीवाल यांनी सांगितले.
खासदार दर्डा इथेच थांबले नाहीत व त्यांनी केजरीवाल यांच्या आयुष्यातील खासगी बाबींबाबतही विचारणा केली. केजरीवाल बॅड बॉयपासून गुड बॉय कसे झाले, अशा प्रश्न त्यांनी केला. यावर केजरीवाल यांनी हसत, मीडियानेच मला बॅड बॉय म्हणून पाहिले, असे उत्तर दिले.
यावेळी केजरीवाल यांनी ‘लोकमत’ची प्रशंसा केली. आज लोकमत महाराष्ट्राचा पर्याय झाला आहे. ज्या सामान्य व्यक्तींच्या सेवाकार्यांना लोकमत शोधतो, त्यांना त्यानंतर देशभरात ओळख मिळते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे व राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने यांना ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खा.कुमार केतकर, श्रीनिवास पाटील, इम्तियाज जलील, सुनील मेंढे व रामदास तडस हेही उपस्थित होते.