लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केरळमधील नैसर्गिक आपत्तीचा फटका स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या पदार्थांना बसला आहे. केरळमधून संपूर्ण देशात जाणाऱ्या मसाल्यांचे भाव २० ते ३० टक्क्यांनी कडाडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील तडका महागला आहे.काळीमिरे, सुंठ, जायपत्री, विलायची, जायफळ, तेजपान, दालचिनी, लवंग आणि सुक्यामेव्याच्या भावातही वाढ झाली आहे, शिवाय खोबरेल तेलाची आवकही कमी झाली आहे. सणासुदीचे दिवस आणि केरळची परिस्थिती सुरळीत होण्यास आणखी काही महिने लागणार असल्यामुळे ग्राहकांना मसाले जास्त भावातच खरेदी करावे लागतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
खोबरेल तेलाची आवक घटलीयंदा काही महिन्यांपूर्वी केरळ आणि कर्नाटक राज्यातील मसाल्यांच्या पदार्थांची आवक वाढल्यामुळे किमती काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. पण केरळातील पुराचा परिणाम पदार्थांच्या किमतीवर पडला. कोकण आणि केरळातून खोबरे व तेलाची आवक होते. खोबरेल तेलाची केरळमधून होणारी आवक थांबली असली तरीही राज्यात व्यापाऱ्यांकडे साठा आहे. अन्य राज्यातूनही तेल येत असल्यामुळे किमतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण केरळातील स्थिती सुधारली नाही तर खोबरेल तेल महागण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.मसाल्यात तेजीची शक्यतासंतोष सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक जगदीश बत्रानी यांनी सांगितले की, केरळ येथील गोदामांमध्ये साठविलेला माल भिजला असून, हाती आलेले पीकही नष्ट झाल्याने पुढील काही महिने केरळमधून येणाऱ्या मसाल्यांच्या भावात तेजी राहण्याची शक्यता आहे. येत्या काळात भावात कोणत्याही प्रकारची घट होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रात श्रावण महिन्यासोबत सणवार सुरू होतात. त्यामुळे मसाला पदार्थांची मागणीदेखील वाढते. मात्र पुरवठा कमी असल्यामुळे मसाल्यांचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीसोबतच विलायची ६०० ते ६५० रुपये किलो, लवंग ५७० रु., जायफळ १७० रु., तेजपान ५० ते १०० रुपये भाव आहेत. याशिवाय सुक्यामेव्याचे भावही वाढले आहेत. काजू ८०० ते ८५० रुपये किलो, बदाम ७०० ते ७५० रुपये आणि आक्रोड-बी ९०० रुपये किलो विकल्या जात आहे.मसाल्यांचे उत्पादन तामिळनाडू, कनार्टक, मध्य प्रदेशात घेतले जाते. पण केरळच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. राज्यात विलायची आणि जायफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. या पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे, यंदा चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या उत्पादनावर पाणी फेरले आहे.