नागपूर : राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेसाठी आलेल्या केरळ संघातील दहा वर्षांच्या खेळाडूचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला. फातिमा निदा शहाबुद्दिन असे मृत बालिकेचे नाव आहे. ती अलप्पी जिल्ह्यातील अंमलपूझा या गावात राहते. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
फातिमा संघासोबत राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी आली होती. नागपूर जिल्हा आणि महाराष्ट्र संघटनेच्या वतीने केडीके कॉलेज शेजारच्या दर्शन कॉलनीस्थित सद्भावना नगर मैदानावर स्पर्धेचे आयोजन गुरुवारपासून करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार केरळ सायकल पोलो संघटनेत वाद असल्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे दोन संघ नागपुरात दाखल झाले. फातिमाचा समावेश असलेला संघ केवळ स्पोर्ट्स कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संघटनेचा संघ होता. तर, दुसऱ्या केरळ राज्य संघाला सायकल पोलो फेडरेशनने मान्यता दिली आहे.
फातिमाचा केरळ संघ केरळ उच्च न्यायालयाचा आदेश सोबत घेऊन बुधवारी येथे पोहोचला होता. तरीही राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजकांनी या संघाला निवासव्यवस्था नाकारली. तथापि संघ अधिकाऱ्यांनी स्वत:च्या ओळखीतून काँग्रेसनगरच्या भारतीय मजदूर संघाच्या इमारतीत मुलींच्या निवासाची व्यवस्था केली. काल रात्री फातिमाला पोटदुखीमुळे अस्वस्थ वाटत होते. तिला उलटीही झाली. सहकाऱ्यांनी गोळी दिल्याने तिला बरे वाटले होते. गुरुवारी सकाळी तिने डॉक्टरला दाखविण्यासाठी साडेनऊच्या सुमारास काँग्रेसनगरचे श्रीकृष्ण हॉस्पिटल गाठले.
डॉक्टरांनी तिला तपासले आणि इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच पाचच मिनिटांत फातिमाने अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. शिवाय सहकाऱ्यांच्या डोळ्यादेखत ती कोसळली. डॉक्टरांनी फातिमाला तपासून मृत घोषित केले. डॉक्टरांनी हृदयगती थांबल्याने मृत्यू म्हटले आहे.
आयोजक उद्घाटनात व्यस्त
दरम्यान, चिमुकल्या खेळाडूचा मृत्यू झाल्यानंतरही आयोजक मात्र उद्घाटन पार पाडण्यात व्यस्त होते आणि त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचा आरोप केवळ सायकल पोलो संघटनेच्या अधिकाऱ्यांनी केला. आयोजन समितीच्या काही पदाधिकाऱ्यांनी दुपारी १२.३० च्या सुमारास इस्पितळात भेट दिल्याचे सूत्रांनी सांगितले. तोपर्यंत फातिमाच्या संघातील सहकारी इस्पितळात ताटकळत होते.
यासंदर्भात सायकल पोलो महासंघाचे सीईओ गजानन बुरडे यांच्याशी संपर्क केला तेव्हा ते म्हणाले, ' केरळचा हा संघ आमच्याशी संलग्न नसला तरी केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही त्यांना खेळण्याची परवानगी दिली. या संघाने स्वतःची व्यवस्था स्वतः करण्याची तयारी दाखविली होती. मृत मुलीला तब्बेतीची समस्या होती. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. आम्हाला उद्घाटनादरम्यान या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. त्यामुळे मृतक मुलीला श्रद्धांजली देत आम्ही ताबडतोब इस्पितळ गाठले.