जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात : गावागावात राजकीय मोर्चेबांधणी
नागपूर : जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी गावगाड्यात ऐन थंडीत राजकीय पारा चढला आहे. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करा, असे आवाहन उमरेडचे आ. राजू पारवे यांनी केले आहे. मात्र ५ जानेवारीनंतरच जिल्ह्यातील किती ग्रा.पं.मध्ये निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट होईल.
जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या सर्वाधिक ग्रा.पं. उमरेड विधानसभा क्षेत्रातील आहेत. यात उमरेड तालुक्यातील १४, कुही तालुक्यातील २५ आणि भिवापूर तालुक्यातील ३ ग्रा.पं.चा समावेश आहे. या ४२ ही ग्रा.पं.मध्ये यापूर्वी बिनविरोधाची परंपरा नाही.
कामठी तालुक्यात नऊ ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. पूर्वीच्या टर्ममध्ये या सर्वच ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. यावेळीही येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. तालुक्यात २०१७ मध्ये गादा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली होती, हे विशेष.
सावनेर तालुक्यातील १२ ग्रा.पं.साठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गतवेळी यात जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली होती. मात्र यावेळी येथे काँग्रेस समर्थक आणि अपक्षांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.
हिंगणा तालुक्यात एकूण पाच ग्रा.पं.साठी निवडणूक होऊ घातली आहे. आधी तालुक्यातील ४८ ग्रा.पं.साठी निवडणूक झाली होती. तीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगला होता. त्यामुळे निवडणूक होऊ घातलेल्या पाच ग्रा.पं.मध्ये राजकीय समर्थक मैदानात उतरले.
जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यात एकाही ग्रा.पं.मध्ये सध्या तरी बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे चित्र आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात सामना रंगण्याची स्थिती आहे.
जामगाव (बुजुर्ग) आदर्श
नरखेड तालुक्यात २०१८ मध्ये झालेल्या ३० ग्रामपंचायत निवडणुकीत येनिकोनी ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक पार पडली होती. तालुक्यातील जामगाव (बुजुर्ग) ग्रामपंचायतची निवडणूक स्वातंत्र्य मिळाल्यापासून बिनविरोध होत आहे. अपवाद फक्त २०१८ चा आहे. या गावात प्रत्येक पक्षाचे तालुकास्तरीय नेते आहेत. गावातील पंचायत समिती नरखेडचे माजी सभापती वसंत चांडक यांनी सांगितले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वोदयी विचारसरणीचे माजी आमदार स्व. जीवनलाल चांडक व काँग्रेस विचारसरणीचे पंचायत समिती माजी सभापती स्व. वसंतराव काळमेघ यांनी गावात स्थानिक राजकारणावरून वादावादी होऊ नये याकरिता सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचे ठरवून, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले होते. यानंतर ही परंपरा सुरू झाली. शासनाने अनेकदा बिनविरोध निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींकरिता विशेष अनुदान जाहीर केले, परंतु जामगाव बुजुर्गला आजवर विशेष अनुदान मिळाले नाही.
---
लोकशाहीत मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करीत असतील तर अशा गावातील विकास कामांना गती मिळते. तिथे खऱ्या अर्थाने ग्राम अभियानाला लोकांचे पाठबळ मिळते. त्यामुळे इलेक्शनपेक्षा सामंजस्याने सिलेक्शन झाल्यास गावात विकासाचे राजकारण शक्य आहे.
- डॉ. राजेश ठाकरे, जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास आघाडी, भाजपा
---------
गावाच्या विकासासाठी गावकरी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करीत असतील तर ही स्वागतार्ह बाब आहे. निवडणूक म्हटली तर मनभेद आलेच. त्यामुळे ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाल्यास त्या गावाच्या विकासाला गती मिळते. गावाची समाजात प्रतिष्ठा वाढते.
प्रा. अवंतिका लेकुरवाळे
कामठी विधानसभा प्रमुख, काँग्रेस, महिला आघाडी
-
प्रत्येक गावाचे राजकारण वेगळे असते. या राजकारणामुळे गावात नेहमीच दोन गटात तेढ निर्माण होत असते. अशा वेळी गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतल्यास लोकशाहीला खऱ्या अर्थाने ताकद मिळते. गावाच्या विकासाला गती मिळते.
समीर उमप, जि.प. सदस्य (शेकाप)
-
निवडणुका जाहीर झालेल्या प्रमुख ग्रा.पं.
भोरगड, जलालखेडा, उमठा, महेंद्री, खुबाळा, खुर्सापार, टेंभूरडोह, पाटणसावंगी, कोहळी, सोनपूर (अदासा), किरणापूर, देवलापार, खेडी, माहुली, नवेगाव, निमखेडा, कोराडी, कळमना (बेला), राजोला, दवलामेटी, द्रुगधामना, सुराबर्डी.