योगेश पांडे/मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जर माझ्या हाती ‘पॉवर’ असती तर २०२० हे वर्षच ‘डिलीट’ केले असते. अवघ्या दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षिकेला ‘ऑनलाईन क्लास’मध्ये दिलेले उत्तर मावळत्या वर्षाबाबत बरेच काही सांगून जात आहे. २०२० हे वर्ष शिक्षण क्षेत्रासाठीदेखील एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणेच राहिले. सरत्या वर्षात ‘कोरोना’ने केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक, प्राध्यापक, शाळा-महाविद्यालय व्यवस्थापन व पालकांचीदेखील परीक्षाच पाहिली. कुणाला वेतन नाही, तर कुणाकडे ‘स्मार्टफोन’ नव्हता. मात्र शिक्षणक्षेत्राने या वाईटातूनदेखील बऱ्याच सकारात्मक बाबीदेखील शोधून काढल्या. त्यामुळे २०२० या वर्षात बरेच काही गमावले असले तरी नवीन संधींबाबत दिशादेखील दाखविली.
विद्यार्थ्यांनी घरबसल्या दिली परीक्षा
‘कोरोना’मुळे उन्हाळी परीक्षा कधी नव्हे इतक्या लांबल्या. अखेर शासनाकडून आलेल्या निर्देशांनंतर ‘ऑनलाईन’ पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. प्रथमच ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घरबसल्या परीक्षा दिली. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘ऑनलाईन’ परीक्षेदरम्यान कमी गोंधळ झाला.
गुणांचा वर्षाव
२०२० मध्ये अनेक गोष्टी नकारात्मक घडत असताना विद्यार्थ्यांना विद्यापीठाने सुखद धक्का दिला. ‘ऑनलाईन’ परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चक्क ९० ते ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर १०० टक्के गुण मिळाले व हा एक ‘रेकॉर्ड’च ठरला.
शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी ‘स्मार्टफोन’च वर्गखोली
अगदी नर्सरीच्या मुलांपासून ते पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचे शिक्षण ‘ऑनलाईन’ पद्धतीने सुरू झाले. बहुतांश विद्यार्थ्यांकडून ‘मोबाईल’चाच वापर करण्यात आला. ‘स्मार्टफोन’ची व्यवस्था करता करता गरीब पालकांच्या नाकीनऊ आले. सुरुवातीला शिक्षक, विद्यार्थी साऱ्यांसाठीच हा प्रकार नवा होता. मात्र आता सर्वच या शिक्षणपद्धतीला सरावलेले आहेत. विशेष म्हणजे वर्षभरात कधी नव्हे इतक्या परिषदा, ‘वेबिनार्स’ यांना शिक्षकांनी उपस्थिती लावली. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत तर हे प्रमाण फारच वाढले होते. त्यामुळे शिक्षकांकडे प्रमाणपत्रांची संख्या वाढली.
‘पीएचडी’चे ‘वायव्हा’ ‘ऑनलाईन’
‘पीएचडी’च्या मौखिक मुलाखतींमध्येदेखील यंदा आमूलाग्र बदल करण्यात आला. एरवी ‘वायव्हा’ म्हटले की परीक्षकांच्या येण्यापासून विविध गोष्टींचे नियोजन करावे लागायचे. मात्र विद्यापीठाने थेट ‘ऑनलाईन’च मुलाखतींना सुरुवात केली. यामुळे संशोधक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला.
विद्यापीठात ‘नवा गडी-नवा राज’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात यंदाचे वर्ष बदलांचे ठरले. सर्वात अगोदर तर विद्यापीठ प्रशासनाचा पसारा नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये हलविण्यात आला. डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे निवृत्त झाले व त्यांच्या जागी डॉ. सुभाष चौधरी यांची कुलगुरूपदी निवड झाली. प्र-कुलगुरू म्हणून डॉ. संजय दुधे यांच्याकडे जबाबदारी आली.
सर्वसमावेशक शिक्षण झाले नाही
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत बदल करण्याचा प्रयत्न शासनाने केला. पण तंत्रज्ञानाची अनुपलब्धता, येणारे अडथळे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचले नाही. शासनाचे सर्वसमावेशक शिक्षणाचे धोरण यंदा फोल ठरले.
सत्र परीक्षांविनाच विद्यार्थी उत्तीर्ण
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेबरोबरच वर्ग १ ते ९ च्या विद्यार्थ्यांच्या यंदा परीक्षाच झाल्या नाही. १९ मार्चपासून शाळा बंद झाल्याने परीक्षाच घेता आल्या नाही. त्यामुळे निकाल कसा घोषित करावा, याबाबतही संभ्रम होता. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले.
बोर्डाच्या निकालावर परिणाम
कोरोनाचा परिणाम बोर्डाच्या निकालावर झाला. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद असल्याने शिक्षकांपर्यंत तपासणीसाठी पेपर उशिरा पोहचले. तपासलेले पेपर बोर्डापर्यंत उशिरा आले. लॉकडाऊनमुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्बंध घातले होते. त्याचा परिणाम निकालाच्या कामावर झाला.
शालेय शिक्षक झाले चौकीदार, सर्वेक्षक
या वर्षात शालेय शिक्षकांनी अध्ययनाचे काम कमी केले असले तरी, त्यांच्यातील विविध कौशल्य निदर्शनास आली. तो पोलिसांसोबत टोलनाक्यावर चौकीदार झाला. रेशनच्या दुकानात सुपरवायझर झाला. सर्वेक्षणात सर्वेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. शालेय पोषण आहाराचा पुरवठादार झाला.
शाळा ओस पडली, विद्यार्थी हिरमुसला
यंदा नवीन सत्रात शाळाच सुरू झाली नाही. त्यामुळे शाळेत वार्षिक होणारे उपक्रम शक्य झाले नाही. नियमित होणारी प्रार्थना यंदा झाली नाही. स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, सहली यंदा निघाल्याच नाही. कधी शिक्षकांचे धपाटे, कधी मिळणारे प्रोत्साहन यंदा मिळालेच नाही. शिक्षकांशी संवाद हरविला. शाळेबद्दलची माया ओसरली, अभ्यासापासून विद्यार्थी निश्चिंत झाला.
शिक्षक व व्यवस्थापनासमोर आर्थिक अडचण
खासगी शाळा, महाविद्यालयातील शिक्षक तसेच व्यवस्थापनासमोर मोठी अडचण निर्माण झाली. अनेक विद्यार्थ्यांची मागील वर्षीचे शुल्क प्रलंबित राहिले व नव्या वर्षाचे शुल्क भरले नाही. दुसरीकडे शासनातर्फेदेखील आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळाली नाही. त्यामुळे व्यवस्थापनांनी शिक्षकांच्या वेतनात मोठी कपात केली. अनेक ठिकाणी तर मागील अनेक महिन्यापासून विनावेतनच काम करावे लागत आहे.
१०७ वा दीक्षांत समारंभ ठरला विशेष
नागपूर विद्यापीठाचा १०७ वा दीक्षांत समारंभ हा विशेष ठरला. या सोहळ्याला विद्यापीठातूनच शिक्षण घेतलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे मुख्य अतिथी होते. विद्यापीठ केवळ पदवी देणारे कारखाने होऊ नयेत असे म्हणत त्यांनी शिक्षण प्रणालीतील त्रुटींवर अचूक बोट ठेवले होते.
‘एनआयआरएफ’मध्ये नऊ संस्था पहिल्या दीडशेत
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत नागपुरातील शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ सुधारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’सह नऊ संस्थांना पहिल्या दीडशेमध्ये स्थान मिळाले.