लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छातीची ढाल बनवून नागरिकांच्या रक्षणासाठी अविश्रांत परिश्रम घेणाऱ्या खाकीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात केली आहे. योग्य ती खबरदारी, आहार, औषध आणि व्यायामाच्या जोरावर पोलिसांनी कोरोनाला हरविण्यात यश मिळवले आहे.
शहर पोलिस दलात ८ हजार अधिकारी-कर्मचारी सेवारत आहेत. साप्ताहिक आणि इतर नैमित्तिक रजा यामुळे साधारणतः आठशे ते एक हजार पोलीस कर्तव्यावर नसतात. मात्र, ७ हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस कर्तव्य बजावताना दिसतात. कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यासोबत गुन्हेगारी नियंत्रण, गुन्ह्यांचा तपास, अवैध धंद्यांना आळा अशी त्यांची नेहमीची कर्तव्य असतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून पोलिसांना त्यांचे ते कर्तव्य बजावतानाच कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्याचीही जबाबदारी पार पाडावी लागत आहे. अदृश्य कोरोनाशी लढताना पहिल्या लाटेत पोलीस आणि त्यांचे नातेवाईक असे एकूण १८८७ जन बाधित झाले. त्यात १७ पोलिसांचा मृत्यूही झाला. तशाही स्थितीत न डगमगता पोलीस आपल्या छातीची ढाल बनवून कोरोनाविरुद्ध लढताना दिसत होते. नागपुरात दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार उडाला होता.
बेड, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिविर मिळत नसल्याने अनेकांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या रोज झपाट्याने वाढत होती. अशात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासाठी अनेक जण सरसावले होते. त्यामुळे औषधांची काळाबाजारी होऊ लागली. या स्थितीत पोलिसांनी मृत्यूचा व्यापार करणाऱ्या नराधमांना वठणीवर आणण्यासाठी नियोजन केले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या सूचनांनुसार परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सापळा रचून २४ तासात दोन कारवाया केल्या. एका डॉक्टरसह १२ जणांना ताब्यात घेतले. ते नराधम बाराशे ते बावीसशे रुपयांचे रेमडेसिविर इंजेक्शन पंचवीस ते पस्तीस हजारांत विकत होते. त्यांना पकडल्यानंतर शहर पोलिसांनी सर्वत्र कारवाईचा धडाका लावला. त्यात रेमडेसिविरची काळाबाजारी करणाऱ्या सुमारे ३२ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. कारवाईच्या या धडाक्याने नागपुरात रेमडेसिविरची होणारी काळाबाजार थांबली. अशाप्रकारे कोरोनाविरुद्धची लढाई लढताना दुसऱ्या लाटेत ४८० पोलिसांना बाधा झाली. त्यातील सात जणांचा मृत्यूही झाला. मात्र, इतर सर्व बाधित पोलीस कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर परतले आहेत.
----
पहिली लाट बाधित पोलीस : १८८७
मृत पोलीस : १७
दुसरी लाट बाधित पोलीस : ४८०
मृत पोलीस ०७
----
एकूण बाधित : २३६७
मृत : २४
----
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी...
प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती औषध, विटामिन सी, विटामिन डी, झिंकोवीट टॅबलेट, ग्रीन ज्यूस दिली जातात. शिवाय त्यांना योगा, मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठीही सांगितले जात आहे.
---
समुपदेशन आणि मार्गदर्शन
कोरोनाची बाधा झालेल्या पोलिसांसाठी शहरात सुसज्ज पोलीस कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यांना सौम्य लक्षणे आहे, अशांना घरपोच औषध-उपचार दिला जातो. शिवाय त्यांच्यासोबत फोनवर सलग संपर्क ठेवून समुपदेशन तसेच मार्गदर्शन केले जाते, असे डॉ. संदीप शिंदे (पोलीस हॉस्पिटल प्रमुख) यांनी सांगितले.