लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अधिकार नसताना दुसऱ्याच्या जागेवर लेआऊट टाकून त्यातील भूखंड परस्पर विकणाऱ्या एका टोळीवर वाठोडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. सतीश नत्थूजी सहारे, त्याची पत्नी पद्मिनी (वय ३७, रा. चिटणीसनगर) आणि राजीक अयूब शहा (मोठा ताजबाग, आदर्शनगर) तसेच शेख शरिफ शेख बाबा (आदर्शनगर) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. त्यातील मुख्य आरोपी सतीश सहारे याचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.
मंगला रामविजय गंभाळे (वय ४५) या दत्तात्रय नगरात राहतात. त्यांची वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ एकर शेती आहे. यातील दीड एकर शेती आरोपी सतीश सहारेने गंभाळेकडून विकत घेण्याचा करार केला होता. त्यासाठी त्याने २१ लाख रुपये दिले होते. नंतर मात्र रितसर विक्रीपत्र अथवा कागदोपत्री पूर्तता न करता आरोपी सहारे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने तीनही एकरात लेआऊट टाकले आणि त्यातील भूखंड लोकांना परस्पर विकण्याचा साैदा केला. कुणाला कब्जापत्र तर कुणाला बयाणापत्र करून दिले. २०१६ मध्ये सहारेचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी राजीक अयूब आणि शेख शरिफने सहारेची पत्नी पद्मिनी यांना हाताशी धरून पुन्हा नव्याने भूखंड विक्री केली. हे करताना आरोपींनी भंगाळे यांच्या बहिणीच्या शेतमालक या नात्याने बनावट सह्या करून त्यांना रक्कम दिल्याची बनावट कागदपत्रेही तयार केली. आपल्या मालकी हक्काच्या शेतावर लेआऊट टाकून तेथील भूखंड परस्पर विकून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर भंगाळे यांनी वाठोडा पोलिसांकडे धाव घेतली. ठाणेदार अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अरुण बांते यांनी चौकशी केल्यानंतर या प्रकरणात गुरुवारी आरोपी सहारे दाम्पत्य, राजीक आणि शरिफ या चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----
पाच हजार फुटांचे भूखंड बळकावले
सहारेच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला विश्वासात घेऊन आरोपी राजीक आणि शरिफने नव्याने १३९ भूखंडांची विक्री केली. त्याबदल्यात लाखो रुपये गिळंकृत करण्यासोबतच आरोपींनी प्रत्येकी पाच हजार चाैरस फुटाचे भूखंडही ठेवून घेतले. आजघडीला या एका भूखंडाची किंमत किमान ५० लाख रुपये आहे.
----
भूखंडधारकही अडचणीत
या व्यवहारातून आरोपींनी आपले उखळ पांढरे करून घेतले. मात्र, त्यांच्याकडून ज्यांनी भूखंड विकत घेतले, त्या सर्वांचीच आज कोंडी झाली आहे. त्यांनी आपली रक्कम गमावली अन् आता या घडामोडीमुळे तेसुद्धा अडचणीत आले आहेत.
---