कोंढाळी भागात शेतकऱ्यांना पीक कर्ज देणारी बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे. गतवर्षी एकूण ८८२ शेतकऱ्यांना ८ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यात ५२० शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांचे नवीन पीक कर्ज तर, ३६२ शेतकऱ्यांना ३ कोटी ५० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती बँकेचे कृषी कर्ज अधिकारी भूषण हेलोंडे यांनी दिली.
शाखा प्रबंधक सौमित्र डे म्हणाले, २०२१ च्या हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. पण कोरोनाच्या काळात बँकेत गर्दी होऊ नये, कोविड नियमाचे पालन करून १०५ शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे नूतनीकरण करून एक कोटी रुपयाचे वितरण करण्यात आले. दोन नवीन शेतकऱ्यांना २ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रसंगी संजय राऊत, नितीन ठवळे, आकाश गजबे, प्रशांत खंते आदींनी विविध समस्या सांगितल्या. यानंतर स्टेट बँकेच्या शाखेतही आढावा बैठक घेण्यात आली. तीत शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कर्जाचे वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.