रामटेक-नरखेड : दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. गत तीन आठवड्यापासून जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातून पाऊस बेपत्ता झाला होता. यासोबतच सोयाबीनसह विविध पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली होती. सोमवारी सायंकाळी व मंगळवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे कुठे नुकसानीची तक्रार नसली तरी दुपारी झालेल्या विजामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण होते. रामटेक तालुक्यात धानाचे पीक हे प्रमुख पीक आहे. १०० टक्के राेवणी आटाेपल्या. पण १८ दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला हाेता. पण मंगळवारी आलेल्या पावसाने हे संकट दूर झाले आहे. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जाेरदार पाऊस पडताे. त्यामुळे धानाचे पीक जाेमाने वाढते. राेग येत नाही. पण यंदा ऑगस्ट काेरडा जाताे की काय, असे वाटत हाेते. बांध्यांमध्ये भेगा पडल्या हाेत्या. धान पिवळे पडायला लागले हाेते. पण मंगळवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्याच्या चिंता दूर झाल्या. रामटेक तालुक्यात आतापर्यंत ५१४ मि.मी. पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. अजूनही नाल्याला पूर आलेला नाही, तरी पिकासाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला आहे. तालुक्यात २०,००० हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. त्यामुळे या पिकाला जीवनदान मिळाले आहे. कुही तालुक्यात धान, सोयाबीन, मिरची, तूर आणि कापसाचा पेरा आहे. मंगळवारच्या पावसाने येथील शेतकरी सुखावला आहे.
खरीप पिकाला मिळाले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:13 AM