नागपूर : मेट्रो रेल्वेच्या डब्ब्यांचे उत्पादन करण्यासंदर्भातील टेंडर प्रक्रियेत सहभागी एका कंपनीच्या पात्रतेवर आक्षेप घेणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी खारीज केली. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा निर्वाळा दिला.टिटागड व्हॅगन कंपनी व टिटागड फायरमा अॅडलर स्पा या कंपन्यांच्या संघाने ही याचिका दाखल केली होती. मेट्रो रेल्वे डब्ब्यांच्या उत्पादनाचे कंत्राट देण्यासाठी नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनने २५ जानेवारी २०१६ रोजी नोटीस जारी करून टेंडर आमंत्रित केले होते. हे कंत्राट मिळण्यासाठी याचिकाकर्त्या कंपनीसह चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन कंपनीने तांत्रिक व आर्थिक बोली सादर केली होती. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी मेट्रो रेल्वेला निवेदन सादर करून चायना रेल्वे कंपनी या कंत्राटासाठी अपात्र असल्याचा दावा केला. मेट्रो रेल्वेने यावर काहीच निर्णय घेतला नाही. दरम्यान, मेट्रो रेल्वेने चायना रेल्वे कंपनीला हे कंत्राट दिले. याचिकाकर्त्यांनी ८५२ कोटी तर, चायना रेल्वे कंपनीने ८५१ कोटी रुपयांची बोली सादर केली होती. चायना रेल्वे कंपनीला अवैधपणे कंत्राट देण्यात आल्याचा दावा करून याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मेट्रो रेल्वेने चायना रेल्वे कंपनी या कंत्राटासाठी कशी पात्र आहे याचे पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने हे पुरावे ग्राह्य धरून याचिका खारीज केली. मेट्रो रेल्वेतर्फे वरिष्ठ वकील एस. के. मिश्रा व अॅड. कौस्तुभ देवगडे यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेविरुद्धची याचिका खारीज
By admin | Published: October 06, 2016 3:10 AM