नागपूर : चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रामटेक तालुक्यातील खिंडसी ओव्हर फ्लो झाला आहे. या ओव्हर फ्लोमुळे नजीकच्या पंचाळा नाल्याला पूर आला आहे. पुराचे पाणी नजीकच्या शेतात शिरल्याने शेकडो एकर शेती पाण्याखाली आली आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच नजीकच्या असोली येथील पुलावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. याचा सर्वाधिक फटका असोली येथील शाळकरी विद्यार्थ्यांना बसतो आहे. याबाबत शासनाने त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात स्थानिक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांची भेट घेत उपरोक्त समस्यांकडे लक्ष वेधले.
रामटेक येथील खिंडसी प्रकल्पात पावसाळ्यात ६५ टक्के पाणी साठा होता. मात्र, २२ सप्टेंबरनंतर झालेल्या मुसळधार पावसाने हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. मांद्री पंचाळा (बु) भागातून खिंडसीचा सलांगमधून पाणी मोठ्या प्रमाणात वाहायला लागले. त्यामुळे पंचाळा, महादुला, घोटी, बेरडेपार, आसोली, शिवाडोगरी, मांद्री, भंडारबोडी, शिवारातील शेतात पुराचे पाणी घुसले. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आसोली-अरोली पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे आसोली येथील आरोली येथे शिकायला जाणारे अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
गतवर्षी सुद्धा हा पूल तुटला होता; पण त्याची कायमस्वरूपी डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे. प्रशासनाने यातून मार्ग काढावा. खिंडसी प्रकल्पाचे पाणी कालव्यातून बाहेर सोडावे. ते सूर नदीद्वारे निघून जाईल. तसेच आरोली मार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.