राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : सिंचनाची समस्या सुटावी म्हणून खिंडसी पूरक कालवा ही महत्त्वाकांक्षी याेजना तयार करण्यात आली. त्यात पेंच जलाशयातील पाणी खिंडसी जलाशयात साेडून ते सिंचनासाठी वापरले जाणार हाेते. पेंच नदीवरील चाैराई धरणामुळे (मध्य प्रदेश) पेंच जलाशयातील पाणीसाठ्यावर विपरीत परिणाम झाला. पेंचमधील पाणीसाठा पूर्ववत ठेवण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकल्पावर खिंडसी पूरक कालवा याेजनेचे भवितव्य अवलंबून आहे.
रामटेक तालुक्यात १५७ गावे आहेत. यातील केवळ २७ गावांना पेंच जलाशयाचे पाणी उपलब्ध हाेते. त्यामुळे इतर गावातील शेतकऱ्यांना काेरडवाहू शेती करावी लागते. ही समस्या साेडविण्यासाठी तसेच शेतीची उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने २०१० साली खिंडसी पूरक कालवा याेजनेला मंजुरी दिली. त्यावेळी या याेजनेचा प्रस्तावित खर्च २०७.०९ काेटी रुपये असल्याचे सांगण्यात आले हाेते. त्यानंतर या याेजनेची किंमत वाढली. यात पेंचमधील पाणी कालवा व टनलच्या माध्यमातून खिंडसीमध्ये साेडले जाणार हाेते. वन विभागाची आडकाठीही दूर करण्यात आली. या याेजनेवर २०० काेटी रुपयापेक्षा अधिक खर्च करण्यात आला असून, अंदाजे १० किमी कालव्याचे व त्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाचे काम शिल्लक आहे.
मध्य प्रदेशातील चाैराई धरणामुळे पेंच नदीवरील ताेतलाडाेह व पेंच या दाेन्ही जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने नवीन समस्या निर्माण झाली. ही समस्या साेडविण्यासाठी राज्य शासनाने कन्हान वळण प्रकल्पाला मंजुरी दिली. यात लाव्हाघाेघरी (मध्य प्रदेश) येथील कन्हान नदीवर असलेल्या तलावातील पाणी डब्ल्यूएपीसीओएसमार्फत ताेतलाडाेहमध्ये साेडले जाणार आहे. यासाठी तयार करण्यात येणाऱ्या टनलची लांबी ६० किमी असून, सहा मीटर गाेलाईचे पाईप वापरले जाणार आहेत.
या याेजनेद्वारे ताेतलाडाेहमधील २८४ दलघमी पाणी वाढविणे शक्य हाेणार आहे. यासाठी २,२८३ काेटी रुपयाचा खर्च प्रस्तावित असून, यासाठी फक्त ५० हेक्टर वनविभागाच्या जमिनीचा वापर केला जाणार आहे. खिंडसी पूरक कालवा याेजना मार्गी लावण्यासाठी लाेकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा तसेच शासनाकडून निधी मंजूर करवून घेत उर्वरित प्रक्रिया व काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
...
जामघाट प्रकल्प बारगळला
रामटेक तालुक्यातील जामघाट प्रकल्पाला सन १९७० मध्ये मंजुरी देेण्यात आली. या प्रकल्पाला १,५०० हेक्टर वनजमीन लागत असल्याने वन विभागाने जमीन देण्यात नकार दिला आणि हा प्रकल्प बारगळला. या प्रकल्पाची किंमत ४,५४६ काेटी रुपये आकारण्यात आली हाेती. याला पर्याय म्हणून कन्हान वळण प्रकल्पाला शासनाने मंजुरी प्रदान केली. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची नागपूर येथे नुकतीच एक बैठक पार पडली. परंतु, या बैठकीत खिंडसी पूरक कालवा याेजनेचा शब्दही उच्चारण्यात आला नाही.
...
दाेन याेजना प्रभावित
चाैराई धरणामुळे रामटेक तालुक्यातील खिंडसी पूरक कालवा याेजना व सत्रापूर उपसा सिंचन याेजना प्रभावित झाली आहे. खिंडसी पूरक कालवा याेजनेमुळे तालुक्यातील २,४९३ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार हाेती. खिंडसी जलाशयाची पाणी साठवण क्षमता १०४ दलघमीची असून, त्यात ६७ दलघमीच्यावर पाणीसाठा राहिल्यास उर्वरित पाणी सिंचनासाठी दिले जाणार हाेते. या याेजनेसाठी खिंडसी परिसरातील शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाला परवानगीही दिली. परंतु, ही याेजना थंडबस्त्यात जाण्याची शक्यता बळावल्याने शेतकऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे.