लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मेट्रो रेल्वेस्टेशनसाठी गुरुवारी संत्रा मार्केट येथील खवा आणि पान बाजार हटविण्यात आला. या सोबतच मार्केटला लागून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले.गुरुवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या तीन चमू खवा मार्केटमध्ये पोहोचल्या. काही महिन्यापूर्वी मार्केटमधील अनेक दुकानदारांना ताकीद देण्यात आली होती. त्यानुसार खवा मार्केटची १० दुकानांच्या खोल्या, १५ सिमेंटचे चबुतरे आणि इतर दुकानदारांचे शेड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. यासोबतच खवा बाजाराच्या जुन्या जर्जर झालेल्या इमारतीचा अर्धा भाग पाडण्यात आला. महापालिकेच्या एक आणि मेट्रो रेल्वे प्रोजेक्टच्या दोन जेसीबीच्या मदतीने सायंकाळी ६ पर्यंत कारवाई सुरू होती. या कारवाईनंतर पथकाने तीन ट्रक साहित्य जप्त केले. ही कारवाई महापालिकेचे सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या उपस्थितीत मंजु शाह, नितीन मंथनवार, प्रकाश पाटील, जमशेद अली व चमूने पार पाडली.मद्यपीने घातला गोंधळखवा मार्केट परिसरात कारवाई दरम्यान एका मद्य प्राशन केलेल्या युवकाने हंगामा सुरु केला. त्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. दारुच्या नशेतील युवकाने कारवाईबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घातला. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.नाक्याजवळ तयार करून दिले पक्के शेडमहापालिकेने खवा मार्केटची जागा मेट्रो प्रकल्पाला दिली आहे. त्यामुळे खवा मार्केट आणि पान बाजारातील दुकानदारांना कॉटन मार्केटला लागून १३ नंबर नाक्यासमोर शाळेच्या जागेवर पक्के शेड तयार करून दिले आहेत. तरी सुद्धा खवा मार्केट, पान बाजाराची जागा दुकानदार सोडण्यास तयार नव्हते. रेल्वेस्थानकाच्या रामझुल्याजवळ मेट्रो रेल्वेचा एक भाग तयार झाला आहे. परंतु खवा मार्केटच्या वळणावर खोदकाम सुरू करावयाचे आहे. परंतु दुकानदारांनी ताबा न सोडल्यामुळे हे काम रखडले होते. याबाबत संबंधित दुकानदारांना नोटीसही पाठविण्यात आली होती.
मेट्रोसाठी हटविले नागपुरातील खवा मार्केट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 9:15 PM
रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ मेट्रो रेल्वेस्टेशनसाठी गुरुवारी संत्रा मार्केट येथील खवा आणि पान बाजार हटविण्यात आला. या सोबतच मार्केटला लागून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले.
ठळक मुद्देअतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई, जुनी इमारत, खोल्या पाडल्यासिमेंटचे चबुतरे तोडले, तीन ट्रक माल केला जप्त