राम देशपांडे : बिंझाणी महिला महाविद्यालयात संगीत परिषद नागपूर : ख्याल गायकीची परंपरा टिकवायची असेल आणि आपले अभिजात भारतीय संगीत समोर न्यायचे असेल तर ख्यालगायकीसाठी गुरु-शिष्य परंपरा जपली पाहिजे. शिष्याची प्रगती साधताना त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न गुरु करतो. ख्यालगायनासाठी गुरुच त्याचा अनुभव उपयोगात आणून शिष्याकडून आवाजाची साधना करवून घेतो आणि त्यातूनच अनेक गायक घडतात. त्यामुळे ख्यालगायनाचे सौंदर्य जपण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेला पर्याय नाही, असे मत सुप्रसिद्ध गायक डॉ. राम देशपांडे यांनी व्यक्त केले. श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय, महाल येथे ‘ख्यालगायकी एक सौंदर्यप्रधान सृजनशील गायनशैली’ विषयावर दोन दिवसीय संगीत परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. उद्घाटन समारंभाला नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ए. के. गांधी, सचिव सुधीर बाहेती, प्राचार्या स्नेहल पाळधीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे संचालन अमृता भुस्कुटे तर आभार सुनिता झिंजर्डे यांनी मानले. प्रथम सत्रात डॉ. विलास कशाळकर यांनी ‘ख्यालगायनाचे बदलते स्वरूप’ विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी काही प्रात्यक्षिकांसाठी त्यांना संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तबल्यावर श्रीधर कोरडे यांनी साथ ंकेली. या सत्राचे संचालन कामिनी एकबोटे यांनी केले. द्वितीय सत्रात ‘बंदिशीतील सौंदर्य रसग्रहण’ विषयावर तारा विलायची व अपर्णा अग्निहोत्री यांनी प्रात्यक्षिक सादर करताना विविध राग आणि बंदिशी सादर करताना त्यातील सौंदर्य उलगडून दाखविले. सायंकाळच्या सत्रात राम देशपांडे यांनी राग मुलतानी, जैत कल्याण, परज कलिंगडा, रागेश्री रागांची सौंदर्यात्मक मांडणी गायनातून व्यक्त केली. भैरवी सादरीकरणाने हा कार्यक्रम संपला. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्याम ओझा यांनी साथसंगत केली. याप्रसंगी गुरु डॉ. नारायण मंग्रुळकर, सुभाष कशाळकर, पं. प्रभाकर धाकडे. संस्थेचे उपाध्यक्ष रमेश खानझोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार व संचालन चारुता भाकरे यांनी केले. परिषदेत डॉ. नारायण मंग्रुळकर यांच्या अध्यक्षतेखाली शोधनिबंधाचे वाचन करण्यात आले. यात सुनिता भाले, अलका चव्हाण, क्षिप्रा सरकार, विनायक भिसे, माणिक मेहरे, अनिरुद्ध खरे, वैखरी वझलवार यांनी शोधनिबंध सादर केला. या सत्राचे संचालन व आभार गायत्री ताजणे यांनी मानले. प्राचार्या स्नेहल पाळधीकर यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अपर्णा अग्निहोत्री, तारा विलायची, गिरीश चंद्रिकापुरे यांनी मनोगत मांडले. समारोपीय सत्राचे संचालन चारुता भाकरे यांनी केले. या परिषदेला संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा प्रतिसाद लाभला. (प्रतिनिधी)
ख्यालगायकीत गुरु-शिष्य परंपराच महत्त्वाची
By admin | Published: January 29, 2015 12:58 AM