लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेला चार वर्षीय मिहिर सिद्धार्थ जांभुळकर नामक बालक तुमसर (जि. भंडारा) तालुक्यातील गोबरवाही येथे आढळला. त्याला सात तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहचवल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.मिहिर बुधवारी सकाळी त्याच्या घरासमोर खेळत होता. अचानक ११ वाजतापासून बेपत्ता झाला. त्याला कुणीतरी दुचाकीवर पळवून नेल्याचे सांगितल्याने पालकांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चार वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण झाल्याची माहिती कळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सहायक आयुक्त पी.एम. कार्यकर्ते यांनी ठाणेदार पी.जे. रायन्नावार यांना लगेच वेगवेगळी पोलीस पथके शोधकामी लावण्यास सांगितले. शोधाशोध सुरू असताना सायंकाळी ६ वाजता अपहृत बालक तुमसरजवळच्या गोबरवाही गावात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार, पोलीस पथकाने तेथे जाऊन अपहृत मिहिरला ताब्यात घेतले. त्याला त्याच्या पालकांच्या कुशीत देताच परिसरातील नागरिकांनी धन्यवाद देत पोलिसांचे अभिनंदन केले.सोशल मीडियाचा फायदाअपहृत मिहिरचा शोध लावण्यासाठी सोशल मीडियाचा चांगला उपयोग झाला. पोलिसांनी अपहृत मिहिरचे छायाचित्र आणि माहिती जिल्ह्यातील पोलिसांना पाठविली. त्यानुसार, भंडारा पोलिसांनी सायंकाळी त्याला प्रतिसाद देऊन छायाचित्रात असलेला बालक मिळाल्याचे नागपूर पोलिसांना कळविले. त्यामुळे मिहिरला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्या आईजवळ पोहचवणे सोपे झाले. पोलीस उपनिरीक्षक उल्हास राठोड, जितेंद्र भार्गव, हवलदार प्रकाश काळे, नायक धनानंद सहारे, संतोष यादव, नीलेश घायवट, विजय लांजेवार, प्रफुल चितळे आणि सुधीर तिवारी यांनी विशेष प्रयत्न केले. दरम्यान, एवढ्याशा बालकाचे अपहरण करून त्याला गोबरवाहीत सोडणारा कोण, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
नागपुरातील अपहृत बालक सात तासात गवसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:12 AM
यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेला चार वर्षीय मिहिर सिद्धार्थ जांभुळकर नामक बालक तुमसर (जि. भंडारा) तालुक्यातील गोबरवाही येथे आढळला. त्याला सात तासात पोलिसांनी आईच्या कुशीत पोहचवल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
ठळक मुद्देअपहरणकर्ता फरार : पोलिसांची शोधाशोध