लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्नांना यश आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास चिमुकली मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये सापडली.श्रद्धा अरुण सारवणे (४) रा. लाकडीपूल, हत्तीनाला असे चिमुकलीचे नाव आहे. अरुण सारवणे (२६) हे मनपाच्या महाल झोन कार्यालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. पत्नी गृहिणी असून मोठी मुलगी श्रद्धा व लहान मुलगा आहे. त्यांच्या शेजारीच लहान भाऊ राहतो. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता श्रद्धा व चुलत भाऊ यश (६) हे दोघेही घरासमोरील रस्त्यावर खेळत होते. दरम्यान २५ ते ३० वर्षे वयोगटातील एक तरुण दुचाकीने तेथे आला. त्याने कबुतर दाखवण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसण्यास सांगितले. श्रद्धा आरोपीच्या दुचाकीवर बसली तर यश घरी निघून गेला. यशने घरी गेल्यानंतर श्रद्धाच्या आईला घटना सांगितली. तिने लगबगीने पतीला फोन केला आणि स्वत:ही परिसरात श्रद्धाला शोधायला लागली. नातेवाईकांनाही माहिती दिली. त्यामुळे तेसुद्धा शोध घेत होते. दोन तासापर्यंत शोधाशोध केल्यानंतर अरुणने लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक यांनी लगेच पथके तयार करून शोधशोध सुरू केली. तसेच गुन्हे शाखेलाही माहिती देण्यात आली. त्यांची पथकेही चिमुकलीला शोधू लागले. गुन्हे शाखा युनिट तीनचे प्रमुख ज्ञानेश्वर भेदोडकर आणि त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत असतानाच ती चिमुकली मेडिकलमधील वॉर्ड क्र.३४ मध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी पथकासह लगेच मेडिकल गाठले. त्यांनी मुलीला ताब्यात घेतले. भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या चिमुकलीची पोलिसांनी आस्थेने विचारपूस केली.शेवटी श्रद्धाला तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले.सोशल मीडियाचा आधारश्रद्धाचे अपहरण झाल्याची खबर वाऱ्यासारखी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटरवर त्या मुलीचे फोटो आणि पत्ता आणि अन्य माहिती फिरत होती. तसेच पोलिसांच्या अनेक व्हॉट्सअॅप ग्रूपमध्ये मुलींचे फोटो व्हायरल झाले होते. शहरभर शोधाशोध सुरू असताना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चिमुकलीचा शोध लागल्याची माहिती आहे.
नागपुरातील अपहृत चिमुकली सहा तासानंतर सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:05 AM
लकडगंज परिसरात घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षीय चिमुकलीचे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अपहरण झाले. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला. लकडगंज पोलिसांचे दोन पथक आणि गुन्हे शाखेचे पाच पथक तयार करून चिमुकलीचा शोध सुरु झाला. अखेर या प्रयत्नांना यश आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास चिमुकली मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक ३४ मध्ये सापडली.
ठळक मुद्देसोशल मीडियाच्या माध्यमातूनच चिमुकलीचा शोध