सारेच संशयास्पद : कसून चौकशीची गरजनागपूर : श्री श्रद्धानंद अनाथालयातून बुधवारी सकाळी संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेला चिमुकला यश (वय ४ वर्षे) शंकरनगर चौकाजवळ पोलिसांना सापडला. त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, जेवढ्या संशयास्पदरीत्या तो बेपत्ता झाला तेवढ्याच संशयास्पदरीत्या तो सापडल्याने हे प्रकरण अधिकच संशयास्पद ठरले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. अनाथालयाच्या अधिक्षिका प्रतिमा श्याम दिवाणजी (वय ४२) यांनी प्रतापनगर ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी सकाळी ६ ते ६.३० या वेळेत प्रार्थना सुरू असताना चिमुकला यश अनाथालयातून बेपत्ता झाला. सर्वत्र शोधाशोध करूनही तो कुठेच आढळला नाही. त्यामुळे अनाथालयाच्या अधिक्षिका प्रतिमा दिवाणजी यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस दलाची वेगवेगळी पथके यशचा शोध घेऊ लागली. अंबाझरी पोलिसांना तो शंकरनगर ते रामनगर मार्गावर बुधवारी दुपारी २ ते २.३० च्या सुमारास बेवारस फिरताना दिसल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ठाणेदार अनिल कातकडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चिमुकल्या यशला खाऊपिऊ घातले. नंतर त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणीही आले नाही. त्यामुळे चाईल्ड लाईनच्या माध्यमातून पोलिसांनी यशची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला पाटणकर चौकातील बालसदनात ठेवले.प्रतापनगर ठाण्यात अपहरणाची नोंद झालेला हाच तो ‘यश‘असल्याचे आणि तो सुखरूप सापडल्याचे वृत्त कळाल्यामुळे संबंधित सर्वांचाच जीव भांड्यात पडला. दरम्यान, यशच्या बेपत्ता होण्याला अनाथालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहे. चाईल्ड लाईनच्या पदाधिकाऱ्यांनीही नाव न छापण्याच्या अटीवर त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित वरिष्ठ या प्रकरणात शुक्रवारी कोणती भूमिका घेतात, त्याकडे सामाजिक संघटनांचे लक्ष लागले आहे.
चिमुकला यश पोलिसांना सापडला
By admin | Published: December 26, 2014 12:43 AM