लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारीकडून सामाजिक क्षेत्राकडे वळू पाहणाऱ्या एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली. विजय नारायण मोहोड (वय २७) असे मृताचे नाव असून तो नरसाळ्यातील जुनी वस्तीत राहत होता.विजय मोहोड हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्नासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास विजय मोहोड, त्याचा मित्र रूपेश बोंडे आणि चंद्रशेखर वैद्य हे तिघे विजयच्या डस्टर कारमध्ये बसून हुडकेश्वरच्या अमित भोजनालयात आले होते. त्यांचा ओल्या पार्टीचा बेत होता. ते आपसात गंमतजंमत करीत असतानाच एका वाहनातून पाच ते सात गुन्हेगार खाली उतरले. त्यांनी विजयला शस्त्राचा धाक दाखवून जबरदस्तीने उठविले आणि आपल्या वाहनात बसविले. तेथून ते वेगात पळून गेले. विजयचे अपहरण करणारांचे मनसुबे लक्षात आल्याने रूपेश बोंडेने विजयचा चुलतभाऊ देवीदास विठोबा मोहोड (वय ४९) यांना फोन करून विजयच्या अपहरणाची माहिती दिली. देवीदास यांनी पोलिसांना कळविले. हुडकेश्वर पोलिसांनी लगेच विजयचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. माहिती कळताच गुन्हे शाखा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही धावपळ सुरू केली. मात्र, पोलिसांना विजयचा पत्ता लागला नाही. आज सकाळी वेळाहरी (बेसा) परिसरात विजयचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून दिसला. नागरिकांनी लगेच हुडकेश्वर पोलिसांना कळविले. पोलिसांचा भलामोठा ताफा तिकडे धावला. विजयचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी तो मेडिकलला पाठविला.
नागपुरात कुख्यात गुन्हेगाराची अपहरण करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 7:17 PM
गुन्हेगारीकडून सामाजिक क्षेत्राकडे वळू पाहणाऱ्या एका कुख्यात गुंडाचे अपहरण करून त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी त्याची निर्घृण हत्या केली.
ठळक मुद्देहुडकेश्वरमध्ये थरार : आरोपी फरार