लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कपडे घेण्यासाठी नागपुरात आलेल्या गोंदियाच्या व्यापारी पिता-पुत्राला गावाला सोडून देण्याची बतावणी करून एका कारचालकाने त्याच्या कारमध्ये बसविले. मध्यरात्री जंगलात नेऊन त्यांना छर्ऱ्याच्या बंदुकीचा धाक दाखवून लुटले आणि पळून गेले. गुरुवारी रात्री घडलेल्या या घटनेची तक्रार पीडित व्यापाऱ्याने शनिवारी गणेशपेठ ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
गोंदियातील शंकर चाैकाजवळ राहणारे प्रवीण प्रभूदास बजाज (वय ४०) कपड्याचे व्यापारी आहेत. गुरुवारी ते मुलगा आर्यन (वय १४) सह कपडे घ्यायला नागपुरात आले. खरेदी करताना त्यांना उशीर झाला. रात्री जेवण करून ते ११ च्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचले. या वेळी शेवटची बस निघून गेली होती. रात्री बसस्थानकावरच मुक्काम करण्याच्या विचारात असताना एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. गोंदियाला जायचे आहे का, अशी विचारणा करून त्याने बजाज पिता-पुत्राला जाधव चौकात उभ्या असलेल्या कारजवळ नेले. तेथे वॅगनआर कार (एमएच २७ - डीए ०५०७)
मध्ये आधीच दोन व्यक्ती बसले होते. त्यांच्यासह बजाज पिता-पुत्राला कारचालकाने गोंदिया मार्गाने नेले. रस्त्यात हुडद गावाजवळ कार शेतात घातली. तेथे बजाज यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी कारचालक आणि त्याच्या कारमधील दोन साथीदारांनी बजाज यांच्या जवळचे अडीच हजार रुपये, सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले. लुटारूंनी बजाज पिता-पुत्राला कडाक्याच्या थंडीत अंधाऱ्या ठिकाणी (शेतात) सोडून पळ काढला. कशीबशी वाट धुंडाळत बजाज पिता-पुत्र रस्त्यावर आले आणि गावकऱ्यांच्या मदतीने गोंदियात पोहोचले. आज त्यांनी नागपूर गाठून गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरण करून लुटल्याचा गुन्हा दाखल केला.
---
सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
या घटनेतील आरोपी शोधण्यासाठी पोलिसांनी बसस्थानक तसेच जाधव चौकातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून कारच्या नंबरवरूनही आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत या प्रकरणात पोलिसांना आरोपी मिळाले नव्हते. मात्र, आम्ही लवकरच आरोपींना पकडू, असे पोलीस सांगत होते.