लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पत्नी सोडून गेल्याच्या रागातून एका गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीने बाजूच्या एका १७ वर्षीय युवकाचे अपहरण केले. तब्बल तीन तास तो त्या युवकाला वेगवेगळ्या भागात फिरवत राहिला. मात्र वेळीच पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपीच्या तावडीतून युवकाला सुखरूप सोडवले. बुधवारी दुपारी ही घटना घडली.
किसन बाबुलाल उईके (वय ३६, रा. खडक पहाड) असे आरोपीचे नाव आहे. तो आधी सुरेंद्रगड गोंड मोहल्ल्यात चंदा शाम कुळमेथे यांच्या घराशेजारी राहत होता. याच भागात राहणारी चिंपा उईके हिच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे ती आरोपी किसनसोबत राहू लागली. तिचा किसनसोबत वाद झाल्यानंतर तिने घर सोडले. चिंपाने चंदाचा मुलगा सुंदरम याला रवीनगर चाैकात नेऊन मागितले. त्यामुळे सुंदरमने तिला चिंपाला आपल्या दुचाकीवर बसवून रवीनगर चाैकात नेऊन सोेडले. हे माहीत पडल्याने किसनने बुधवारी दुपारी १२ वाजता जबरदस्तीने सुंदरमला आपल्या मोटरसायकलवर बसवले. तो सुंदरमला वेगवेगळ्या भागात फिरवू लागला. ते लक्षात आल्यानंतर चंदा कुळमेथे यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे धाव घेतली. तिने सुंदरमच्या अपहरणाची तक्रार देतानाच किसन गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचेही सांगितले. एमआयडीसीत घडलेले रा. पांडे अपहरण आणि हत्याकांडाचे प्रकरण लक्षात घेता, हादरलेल्या पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवली. आरोपी किसनचा शोध घेत त्याच्या तीन तासानंतर कांजी हाऊस चाैकात मुसक्या बांधण्यात आल्या.
----
...तर तुझे खरे नाही
आरोपी किसन हा सुंदरमला चिंपाला कुठे सोडले, ते खोदून खोदून विचारत होता. ती सापडली नाही तर तुझे काही खरे नाही, अशी धमकीही देत होता. पोलीस उपायुक्त विनिता साहू तसेच सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, ठाणेदार गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास चाैधरी यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक लक्ष्मी चाैधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
----