नागपूर : कुख्यात गुन्हेगार बॉबी धोटे याने मेट्रोमध्ये कार्यरत एका अभियंता तरुणाचे अपहरण करून दागिने आणि मोबाइल लुटून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. सक्करदरा पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या या घटनेमुळे शनिवारी रात्री पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना १२ तासांच्या आत अटक केली आहे.
प्रशांत ऊर्फ बॉबी गजानन धोटे (३३ ओमनगर, सक्करदरा), प्रणय प्रकाश चन्ने (३३, महिला महाविद्यालय, नंदनवन) व मोहम्मद वसीम मोहम्मद नईम शेख (३२, न्यू नंदनवन लेआउट) अशी आरोपींची नावे असून, त्यांचा एक साथीदार स्वप्निल मांडळकर हा फरार आहे. बॉबी धोटे हा विजू मोहोड हत्याकांडातील आरोपी आहे. प्रणय चन्नेचे गुन्हेगार आणि बुकींशी संबंध आहेत. हे दोघेही मेट्रोमध्ये कार्यरत असलेल्या रमना मारुती येथील रहिवासी असलेल्या हर्षल इंगळे या अभियंत्याचे मित्र आहेत.
चार आरोपी आणि हर्षल शनिवारी रात्री सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विताली बारमध्ये आले होते. रात्री १ वाजता बार बंद झाल्यानंतरही त्यांना दारू प्यायची होती. आरोपींनी हर्षल यांना धरमपेठेतील एका बारमध्ये चलण्यास सांगितले. हर्षलने नकार दिल्याने आरोपींनी त्याला जबरदस्तीने लाल रंगाच्या कारमध्ये बसवले. त्यांनी हर्षलला व्हेरायटी चौकात नेले. दरम्यान, हर्षलचा आरोपींसोबत वाद झाला. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. तसेच चेन, मोबाइल व ब्रेसलेट हिसकावले. त्यांना पाच लाख रुपयांची खंडणी मागितली व पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना व्हेरायटी चौकाजवळ सोडून ते पळून गेले.
हर्षल यांनी सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत लगेच तपासाला सुरुवात केली. प्रतापनगरातील डिजो लॉज आणि हॉटेलमध्ये आरोपी असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली. पोलिसांनी छापा टाकून बॉबी, प्रणय आणि वसीमला पकडले. त्यांनी स्वप्निल मांडळकरच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. विजू मोहोड खून प्रकरणात बॉबी सशर्त जामिनावर आला आहे.
बॉबी आणि त्याचे साथीदार तिरंगा चौक टोळीशी संबंधित आहेत. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, अविनाश जायभाये, सुनील ठवकर, देवेंद्र नवघरे, अतुल चाटे, दीपक चोले, संदीप मावलकर, श्रीकांत मारवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.