राकेश घानोडेनागपूर : पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा आणि तिला दगडाने ठेचून ठार मारणारा क्रूरकर्मा संजय पुरी (३७) याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण दाखल केले आहे. त्यावर येत्या १ जुलै रोजी न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. ही संतापजनक घटना कळमेश्वर तालुक्यामधील लिंगा गावात ६ डिसेंबर २०१९ रोजी घडली.
सत्र न्यायालयाने संजय पुरीला ३ जून २०२४ रोजी फाशीची शिक्षा सुनावली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम ३६६ अनुसार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारने हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल केले आहे. लिंगा गाव एका शेतामुळे दोन वस्तीत विभागले गेले आहे. पीडित चिमुकली गावाच्या एका भागात आईवडिलांसह राहत होती तर, दुसऱ्या भागात तिच्या आजीचे घर होते. ६ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ती शेत ओलांडून आजीच्या घरी जात होती. दरम्यान, पुरीने तिला उचलून शेताच्या आतमध्ये नेले व तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर तिची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या केली. चिमुकली अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी ७ डिसेंबर रोजी कळमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. परंतु, दोन दिवस चिमुकलीचा पत्ता लागला नाही. परिणामी, पोलिसांनी गावात पोहोचून सखोल तपास केला असता पुरीचे वर्तन संशयास्पद वाटले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.