लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही मूत्रपिंड (किडनी) निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील किडनी प्रत्यारोपण केंद्र आशेचे किरण ठरत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा फटका प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांना बसत आहे. जानेवारीपासून औषधांचा पुरवठा ठप्प पडल्याने या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. ढेपाळलेले रुग्णालय प्रशासन रुग्णाचा जीव गेल्यावरच जागे होईल का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.किडनी प्रत्यारोपणानंतर संसर्गाचा धोक्याची भीती असते. किमान एक वर्षे खंड न पडता औषधे घ्यावी लागतात. ही औषधे महागड्या व सामान्यांच्या अवाक्याबाहेरील आहेत. यातील ‘वल्गानसायक्लोवीर’ ही एक गोळी बाजारात साधारण ४०० रुपयांची तर ‘सायक्लास्पोरीन’ ही गोळी २०० रुपयांची आहे. गरीब रुग्णांवर या औषधांचा भार पडू नये म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत या औषधांचा समावेश करण्यात आल आहे. प्रति लाभार्थ्यामागे एक लाख रुपये रुग्णालयाला उपलब्ध करून दिले जात आहे. निधी असल्यामुळे रुग्णांना दरकरारावर किंवा कोटेशन पद्धतीवर किंवा स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करून देण्याचे नियम आहेत. परंतु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वरिष्ठांचा वचकच नाही. यामुळे याचा फायदा लिपीकापासून ते फार्मासिस्ट घेत असल्याचे दिसून येते. १२ जानेवारीपासून ‘वल्गानसायक्लोवीर’ व ‘सायक्लास्पोरीन’ या महागड्या औषधांचा तुटवडा पडला तरी लिपीक आणि फार्मासिस्ट यांनी पुढाकार घेतलेला नाही. या संदर्भाची तक्रार विशेष कार्य अधिकाऱ्यांकडून करूनही एकमेकांकडे बोट दाखविण्याशिवाय त्यांनी काम केलेले नाही. विशेष कार्य अधिकारीही त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याने रुग्णालयाचा कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
औषधनिर्माण शास्त्र विभागाचा गलथानपणाकिडनी प्रत्यारोपण रुग्णांच्या औषधांच्या तुटवड्यात मेडिकलच्या औषधनिर्माण शास्त्र विभागाचा गलथानपणा समोर आला आहे. हाफकिन कंपनीकडून दीड वर्षे होऊनही किडनी प्रत्यारोपणानंतर दिले जाणारे औषध उपलब्ध न झाल्याकडे विभागाने लक्ष दिले नाही. ही औषधे संपण्यापूर्वीच ‘कोटेशन’पद्धतीमधून उपलब्ध करून दिली नाही. रुग्ण हॉस्पिटलचा चकरा मारीत असताना स्थानिक पातळीवर त्याची खरेदी केली नाही. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रश्न लावून धरला तेव्हा १८ फेब्रुवारी रोजी ‘कोटेशन’वर औषधे मागविण्यात आली. परंतु अद्यापही औषधे आली नसल्याने सोमवार, २५ फेब्रुवारी रोजी रुग्णांना पुन्हा खाली हात परतावे लागले.