नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बंद होत्या. परिणामी, गेल्या आठ महिन्यांपासून १५ वर रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. यामुळे कोविडच्या नियमांचे पालन करीत पुढील आठवड्यापासून पुन्हा एकदा प्रत्यारोपणाला सुरुवात करण्याचा निर्णय मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी घेतला आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यावेळच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत ६५वर रुग्णांवर मूत्रपिंड प्रत्यारोपण करून त्यांना जीवनदान देण्यात आले. पूर्वी महिन्यातून एक होणारी शस्त्रक्रिया, डॉ. मित्रा यांनी अधिष्ठात्यांची सूत्रे हाती घेताच आठवड्यातून एक शस्त्रक्रिया करण्याचे निर्देश दिले. यातील बहुसंख्य शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात आल्या. यामुळे रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी रुग्णांची गर्दी वाढली. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या. कॅडव्हेर ट्रान्स्प्लान्टही बंद झाले. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ घातल्याने गुरुवारी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ व झेडटीसीसीचे सचिव डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. समीर चौबे व युरोलॉजी विभाग प्रमुख डॉ. धनंजय सेलुकर यांची संयुक्त बैठक घेऊन मूत्रपिंड प्रत्यारोपणासोबतच कॅडेव्हर अवयव प्रत्यारोपण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-प्रत्यारोपण रुग्णांसाठी डायलिसीसची विशेष सोय
डॉ. मित्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, कोविडच्या नियमांचे पालन करूनच अवयव प्रत्यारोपण केले जाणार आहे. रुग्ण व अवयव दात्याची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. निगेटिव्ह अहवाल आल्यावर त्यांना कोविड हॉस्पिटलमधील एका विशेष कक्षात क्वारंटाईन केले जाईल. प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर डायलिसीसची गरज पडल्यास तशी सोय सुद्धा असणार आहे.