लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टाईप-१ मध्ये असलेल्या मधुमेहग्रस्त बालरुग्णांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपले इन्सुलिन टाळू नये किंवा कमी करू नये. तसे करणे अत्यंत जोखिमीचे आहे. जवळच्या मेडिकल्समधून खरेदी करा, बिल आम्ही देऊ, असे आवाहन नागपुरातील ड्रीम ट्रस्टचे मुख्य कार्यवाह डॉ. शरद पेंडसे यांनी केले आहे.१९९७ मध्ये स्थापन झालेली नागपुरातील ड्रीम ट्रस्ट ही संस्था आता २५ वर्षांत आहे. या संस्थेंतर्गत टाईप-१ मध्ये असलेल्या रुग्णांना मोफत इन्सुलिन दिले जाते. या संस्थेकडे विदर्भातील दोन हजारावर रुग्णांची नोंदणी आहे. ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे, अशा मुलांसाठीच ही संस्था सेवा देते. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून रुग्ण येथे येऊन नियमितपणे इन्सुलिन प्राप्त करून घेतात. मात्र सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने नागपुरात येऊन इन्सुलिन नेणे शक्य नाही. त्यामुळे अनेक रुग्ण डोज घेण्याचे प्रमाण कमी करू शकतात किंवा टाळू शकतात. मात्र असे करणे अत्यंत धोक्याचे आहे. त्यामुळे मृत्यूसारखी गंभीर परिस्थिती ओढवू शकते. हा धोका टाळण्यासाठी रोज ठरल्याप्रमाणे डोजेस घ्या, असे कळकळीचे आवाहन डॉ. पेंडसे यांनी केले आहे.नागपुरातील धंतोलीमध्ये या ट्रस्टचे काम सुरू असून, लॉकडाऊनच्या काळातही रोज सकाळी ९ ते दुपारी १२ अशी सेवा दिली जात आहे. येथे नोंदणी असलेल्या रुग्णांना नि:शुल्क इन्सुलिन, सिरिंज, साहित्य दिले जात आहे.काय आहे डायबेटिस टाईप-१डायबेटिस टाईप-२ हा सर्वसामान्य व्यक्तींमध्ये दिसणारा आजार आहे. ताणतणाव, बदललेली जीवनशैली यामुळे अधिक वयाच्या व्यक्तींना तो उद्भवतो. मात्र डायबेटिस टाईप-१ हा जन्मत: होतो. दोन ते २० वर्षांच्या मुलांमध्ये तो आढळतो. यात त्यांना रोज ३ ते ४ डोजेस घ्यावेच लागतात. अन्यथा मृत्यूची संभवना असते. त्यामुळे हा अत्यंत घातक असून, सध्याच्या कोरोनाच्या काळात अशा रुग्णांनी स्वत:ला जपावे, डोजेस कमी करू नये, असे डॉ. पेंडसे यांचे आवाहन आहे.डोज कमी करू नकाडायबेटिस टाईप-२ मधील रुग्णांनी डोजेस अजिबात कमी करू नये. संबंधित रुग्णाजवळील साहित्य संपले असल्यास व लॉकडाऊनमुळे ते ड्रीम ट्रस्ट संस्थेकडून नेणे शक्य नसल्याने रुग्णांनी गावातील मेडिकल स्टोअर्समधून खरेदी करावे. लॉकडाऊन उघडल्यावर बिल जमा केल्यास संस्था तेवढी रक्कम परत करेल, असेही डॉ. पेंडसे यांनी म्हटले आहे.
मधुमेहग्रस्त बालकांनो, इन्सुलिन टाळू नका! ड्रीम ट्रस्टचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 8:42 PM
टाईप-१ मध्ये असलेल्या मधुमेहग्रस्त बालरुग्णांनी सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आपले इन्सुलिन टाळू नये किंवा कमी करू नये. तसे करणे अत्यंत जोखिमीचे आहे. जवळच्या मेडिकल्समधून खरेदी करा, बिल आम्ही देऊ, असे आवाहन नागपुरातील ड्रीम ट्रस्टचे मुख्य कार्यवाह डॉ. शरद पेंडसे यांनी केले आहे.
ठळक मुद्दे विदर्भात सुरू आहे नि:शुल्क सेवा